राज्यावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना दुसरं अफवांचं पीक खुप वाढलं आहे. करोनाच्या आजाराबरोबरच आता दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जात आहे. दहावी, बारावीच्या निकालाची तारीख सोशल मीडियात व्हायरल झाली होती. त्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं खुलासा केला आहे.

करोनाचं राज्याच्या उंबरठ्यावर असताना दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षांचा निकाल जूनमध्ये जाहीर केला जातो. सध्या जून महिना निम्मा संपला असून, अद्यापही निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात एक मेसेज व्हायरल झाला होता.

या व्हायरल झालेल्या मेसेजवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं खुलासा केला आहे. “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नाही. निकालासंदर्भात सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेऊ नये,” असं आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिवांनी केलं आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात दहावीच्या एका विषयाचा पेपर तसाच राहिला होता. त्या विषयाच्या गुणाबाबत शिक्षण विभागानं नंतर निर्णय घेतला होता. सध्या शाळा कधी उघडणार याकडे सर्वांचं लक्ष असून, शिक्षण विभागानं त्याबाबतही एक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.