टोळीच्या सूत्रधाराला बिहारमधून अटक

पतंजलीच्या उत्पादनाचा वितरक म्हणून नेमणूक करण्याचे आमिष दाखवून देशभरातील व्यापाऱ्यांची इंटरनेटच्या माध्यमातून लूट करणाऱ्या बिहारमधील टोळीच्या प्रमुखाला नगरच्या सायबर पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन अटक केली. त्याला दि. २८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला. राहुरीतील देविदास हौशिनाथ दहिफळे (वय ४१) यांनी एका संकेतस्थळावर पतंजलीच्या उत्पादनांसाठी वितरक नियुक्त करण्याची जाहिरात ३ ऑगस्टला वाचली, दहिफळे यांनी त्यावर संपर्क केला. या साईटवर राघवेंद्रसिंग या व्यक्तीने पंजाब बँकेच्या खात्यावर २५ हजार २०० रुपये भरून नोंदणी करण्यास सांगितले. ते भरताच पुन्हा अनामत रक्कम म्हणून २ लाख ७५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ते जमा करताच दहिफळे यांना पतंजलीचे वितरक म्हणून नियुक्त केल्याचे प्रमाणपत्र मेलद्वारे पाठवण्यात आले. परंतु मालासाठी संपर्क करताच दहिफळे यांना राघवेंद्रसिंग याने १० लाख आगाऊ भरण्यास सांगितले. त्यामुळे दहिफळे यांना संशय आल्याने पतंजली कंपनीकडे संपर्क केला. त्यांनी दहिफळे यांना ती साईट पतंजलीची नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

अनेकांची लूट

केवळ पतंजलीच्या उत्पादनाबाबतच नव्हे तर इंटरनेटच्या माध्यमातून एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी जमीन भाडय़ाने द्या व त्याबदल्यात ५ लाख रुपये अनामत व ५० हजार रुपये भाडे मिळवा, बँकांमधील नोकर भरतीसाठी बेरोजगार तरुणांचीही त्याने फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. या टोळीने महाराष्ट्रात धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला येथे तसेच तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणीही लोकांची फसवणूक केली आहे.केवळ पतंजलीच्या नावाखाली त्याच्या बँक खात्यात तब्बल ५० लाखांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.