News Flash

अतिवृष्टीमुळे नळदुर्ग किल्ल्याची पडझड

पाणी ओसरल्यानंतर समोर आली दुरवस्था

राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणून ख्याती असलेल्या नळदुर्ग येथील किल्ल्याची अतिवृष्टीमुळे पडझड झाली आहे. बोरी नदीच्या प्रवाहाने रौद्र रूप धारण केल्यामुळे तब्बल २५ वर्षांनंतर पाणी महालावरून पाणी कोसळत होते. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे किल्ल्यातील अनेक भागांची पडझड झाली असून पाणी महालाचेही मोठे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर किल्ल्यातील अनेक ठिकाणांची दुरवस्था समोर आली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केलेली अनेक कामे चक्क वाहून गेली आहेत. सुमारे ५० लाखाहून अधिक नुकसान त्यामुळे झाले असल्याचा दावा किल्ल्याचे विकासक असलेल्या खासगी कंपनीने केला आहे.

मागील सहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदीला पूर आला होता. नदीच्या जलसाठ्यात अवघ्या दोन दिवसातील मुसळधार पावसाने वाढ झाली. किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक हे तिन्ही धबधबे सुरू झाले होते. पाण्याचा जसजसा प्रवाह वाढत गेला, तसतसे पाण्याच्या प्रवाहाने रौद्र रूप धारण केले. सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन कंपनीने पाणी महलाच्या खालील बाजूस बांधलेल्या तळ्याचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले लोखंडी पाईपचे बॅरीगेड व सुशोभिकरणाचे नुकसान झाले आहे.८० फूट उंच असलेल्या पाणी महालावरून पाणी कोसळत असताना आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा पहायला मिळाले.

किल्ल्यातील नर-मादी धबधबा पाहताना कोणत्याही पर्यटकाच्या जीवितास धोका होवू नये यासाठी भिंतीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक लोखंडी पाईप बसविण्यात आले होते. दरम्यान बुधवारी झालेल्या पावसामुळे बोरी नदीस महापूर आला. नळदुर्गच्या बोरी धरणाच्या बांधकामनंतर आलेला हा सर्वात मोठा महापूर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महालाच्या भिंतीवरुन सुमारे १५ फूट पाणी वाहून पडत होते. त्यामुळे या महापुरात आलेल्या अनेक झाडा झुडपांमुळे, सोयाबीनच्या गंजीमुळे अनेक साहित्य वाहून गेले आहे.
पन्नास लाखाच्या नुकसानीचा अंदाज
किल्ल्यात युनिटी मल्टीकॉन या कंपनीने पर्यटनस्थळ विकासासाठी बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रेक्षणीय १० लाख लिटरचे दोन मोठे बंधारे निर्माण केले होते. तसेच शोभेची फुलझाडे, बगीचा, कारंजे, संरक्षक साहित्य, रस्ते, आंब्याची झाडे, सहा वीज पंप पाण्याच्या अतिवेगातील प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे कंपनीचे जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संचालक कपील मौलवी यांनी वर्तविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 7:18 pm

Web Title: fall of most parts of naldurg fort due to heavy rains scj 81
Next Stories
1 सांगली-कोल्हापूरात पूर आलेला असताना, वाजंत्री लावून महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्यांनी…. – बाळासाहेब थोरात
2 दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
3 सावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच!
Just Now!
X