प्रसेनजीत इंगळे

करोनाबळींची लपवाछपवी सुरूच, एप्रिल महिन्यात १००३ रुग्णांचा मृत्यू, केवळ १८६ जणांची नोंद

विरार : वसई-विरार शहरातील करोनाबळींची लपवाछपवी करण्याचे प्रकार महापालिकेकडून सुरूच आहेत.  एप्रिल महिन्यात शहरातील स्मशानभूमीत १ हजार ३ करोनाबाधित मृतदेहांवर वसई-विरार पालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र पालिकेने केवळ १८६ करोनाबाधितांचे मृत्यू झाल्याचे अहवालात दाखवले आहेत.

वसई-विरार शहरात करोनाने हाहाकार उडवलेला आहे. दररोज सरासरी ७०० ते ८०० रुग्ण आढळून येत आहेत. पालिकेतर्फे दररोज करोनाचा दैनंदिन अहवाल सादर केला जातो. त्यात शहरातील करोना मृत्यूचे आकडे दिले जातात हे आकडे शासनाच्या नियमानुसार दिले जात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. पण पालिका करोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा कमी दाखवत असल्याचा आरोप होत असल्याने मागील ३० दिवसांचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील महिन्यात १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान शहरात तब्बल १००३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्मशानात अंत्यसंस्कार झालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. पण पालिकेने केवळ १८६  मृत्यू झाल्याचे त्याच्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे. शुक्रवार २३ एप्रिल रोजी शहरात सर्वाधिक ७३ बळींवर अंत्यसंत्कार झाले. पण या दिवशीच्या पालिकेच्या दैनंदिन करोना अहवालात केवळ १६ मृत्यू दाखवले आहेत. इतकी मोठी तफावत कशी निर्माण होते असा सवाल उपस्थित झाला आहे. स्मशानभूमीत करोनाबाधित मृतदेहांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार केले जातात. त्यांच्याकडे असलेल्या आकडेवारीवरून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात जे ११०३ करोनाबाधित रुग्ण दगावले त्यात ६९४ परुष आणि ३०९ महिलांचा समावेश आहे. तर १७ रुग्ण घरी दगावले अशी माहिती आहे. पण पालिकेच्या दप्तरी केवळ १८६ मूत्यूची महिनाभराची नोंद आहे. यामुळे इतर ८१७ नागरिकांची नोंद कुठे आणि कधी होणार असा सवाल विचारला जात आहे.

चालू वर्षांत स्मशानभूमीतून एकत्रित केलेल्या आकडेवारी नुसार जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ शहरात एकूण १०९७ रुग्णांचे करोनाग्रस्त म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र पालिकेकडे केवळ २१५  रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. मागील तीन महिन्यात ८८२ करोनाग्रस्त रुग्णांचा अहवाल पालिकेच्या यादीत नाही आहे.

पालिकेची सारवासारव

शहरातील करोनाबाधितांचे मृत्यू मोठय़ा संख्येने होत असल्याचे वृत्त मागील महिन्यात लोकसत्ताने पुराव्यासहित दाखवून दिले होते. त्यावेळी पालिकेने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरी दिलेले आकडे देत असल्याचे कारण देत सारवासारव केली होती. आ्म्ही करोनाबाधित मृतांचे अहवाल आयसीएमआरकडे पाठवतो. तो जो अहवाल पाठवतात त्यावरून दैनंदिन मृतांचे आकडे ठरवतो, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु स्मशानभूमीत ज्या करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले जातात, त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर (डेथ सर्टिफिकेट) करोना संशयित असा उल्लेख असतो. शासनाच्या निर्देशनानुसार करोना संशयित हेच करोनाबाधित म्हणून गणले जातात. तरी देखील महापालिका हे करोनाबळी लपवत असल्याचे उघड झाले आहे.

पालिकेचा खोटेपणा उघड

आयुक्त गंगाथरन डी. यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर आम्ही केवळ पालिकेच्या रुग्णालयातील मृतांचे आकडे दैनंदिन अहवालात देतो, असे म्हटले होते. केवळ एप्रिल महिन्यात पालिकेच्या कौल सिटी रुग्णालयात ८० रुग्ण, चंदनसार पालिका रुग्णालयात ११७, तर तुळींज रुग्णालयात १०२ आणि सर डी एम पेटीट रुग्णालयात  २३  रुग्ण दगावले आहेत. पालिकेच्या या ४ रुग्णालयात मिळून एकाच महिन्यात ३३२  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पालिका अहवालात केवळ १८६ रुग्णांची नोंद आहे. यामुळे पालिका त्यांच्या रुग्णालयातील माहितीसुद्धा लपवत असल्याचे समोर आले आहे.

वसई-विरार महानगरपालिकेने सदराची आकडेवारी लपवणे हा गुन्हा आहे. ही आकडेवारी नागरिकांना घाबरविण्यासाठी नसून केवळ प्रशासनाचे डोळे उघण्यासाठी आहे, पालिकेने राजकीय पुढारी, समाजसेवक, सामाजिक संस्था आणि वैद्यकीय यांना एकत्र घेऊन करोनावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. पालिका मृतांची आकडेवारी लपवत असल्याने पालिकेच्या विरोधात मानवी हक्क आयोग यांच्याकडे याचिका दाखल करणार आहे.

– राजीव पाटील, माजी महापौर