दरातील घसरण थांबली

गतवेळच्या तुलनेत कापसाला दीड हजार रुपयांचा दर कमी मिळत असून, फेब्रुवारी अखेपर्यंत त्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे कापूस दरातील घसरण थांबली आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

यंदा अमेरिकेतील वादळ, अन्यत्र प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे जागतिक उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तर जगात कापसाला मोठी मागणी येणार असल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज नसून प्रतिक्विंटल सुमारे पाच हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. हे तज्ज्ञांचे आडाखे चुकले असून यंदा आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या अंदाजानुसार कापसाचे उत्पादन २५५ लाख टनांपेक्षा जास्त होणार आहे. मागील वर्षीपेक्षा हे उत्पादन २५ लाख टनाने अधिक होणार असल्याने आता जागतिक पातळीवरही कापसाचे दर उतरले आहे. देशात कापसाची लागवड अधिक झाली असून उत्पादन विक्रमी होणार आहे, असा अंदाज भारतीय कापूस फेडरेशनने वर्तविला आहे.

ऑल इंडिया जिनिगमिल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनीही देशांतर्गत उत्पादन हे तीन कोटी, ९० लाख गाठींवर जाण्याची शक्यता व्यक्त केली असून कापूस निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप त्या संदर्भात निर्णय झालेला नाही. त्यातच सरकीची किंमत खाली असून त्यामुळे उद्योगासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

कापूस दरात घसरण व बाजारात कापूस गाठीला कमी मागणी असल्याने देशातील चार हजार व राज्यातील १२ हजार जिनिगमिलपकी निम्म्या मिल बंद आहेत. उद्योगातील मंदी, आंतरराष्ट्रीय बाजारातील खालावलेल्या किमती यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला कमी दर मिळत होता. हा दर ३५०० ते चार हजार रुपये क्विंटलवर आला होता. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी सुरू केली होती. प्रतिक्विंटल ४३२० रुपये दराप्रमाणे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात होता. पण गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे आता कापसाच्या दरातील घसरण थांबली आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमुळे कापसाला ४३२० रुपये हमीभाव व त्यावर ५०० रुपये गुजरात सरकार देणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील कापूस खरेदीवर झाला आहे. गुजरातमध्ये आखूड धाग्याचा कापूस तयार होतो. यंदा या राज्यात कपाशीवरती बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला. उत्पादनात घट आली. तसेच गुजरात राज्यात पिकणारा कापूस हा आखूड धाग्याचा असतो. त्यात २० टक्के कापूस हा लांब धाग्याचा एकत्र करून वापरावा लागतो. त्यामुळे या राज्यातील जिनिगमिल चालक हे नगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद आदी भागांत कापूस खरेदी करून नेत आहेत. स्थानिक प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून तो गुजरातला पाठवितात. गुजरातच्या सरहद्दीवरील काही लोक राज्यातून कापूस खरेदी करून तो तिकडे सरकारी खरेदी केंद्रावर नेऊन घालत असून नफा कमवीत आहेत.

शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

राज्यात ३४ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पण त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. महामंडळाने ५० लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. पण खुल्या बाजारात जास्त दर मिळत असल्याने आत्तापर्यंत केवळ पाच हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.   – यू. के.सिंग, नोडल ऑफिसर, भारतीय कापूस महामंडळ, औरंगाबाद

गुजरातमुळे हवा, पण दर कमीच राहतील

गुजरात राज्यातील आखूड धाग्याच्या कापसात राज्यातील लांब धाग्याचा कापूस एकत्र करण्यासाठी नेला जातो. त्यामुळे भाववाढीची हवा झाली असली तरी दर स्थिर राहतील. वायदे बाजारात फेब्रुवारीपर्यंत कमी भावाचे सौदे झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असून सरकीचे दरातही घसरण झाली आहे. त्यामुळे मागील वर्षी ६ हजार रुपयांवर दर गेले होते. यंदा ते कमीच राहतील.  – प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिगमिल असोसिएशन, जळगाव</strong>

कापूस उद्योगात सावधगिरी

मागील वर्षी सरकी व कापसाचे दर वाढले होते. पण नंतर दर खाली आल्याने जिनिगमिल उद्योगाला सुमारे २ हजार कोटींचा फटका बसला. दुधाचे दर उतरल्याने आता पशुखाद्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे सरकीपेंडीचे दर वाढण्याची शक्यता नाही. साहजिकच सध्याच्या दराने कापूस खरेदी करणे अडचणीचे ठरत आहे. गुजरातमुळे दरातील घसरण काही प्रमाणात थांबली. आत्ताच पुढील अंदाज करता येत नसल्याने सावधगिरी बाळगली जात आहे.   – अनिल सुराणा, उद्योजक