रवींद्र जुनारकर

गट्टेपल्लीत जहाल नक्षलवादी साईनाथची ‘तेरवी’

मुलाचा मार्ग चुकला, त्याने नक्षलवादी चळवळीत सहभागी व्हायला नको होते, वाईट व चुकीच्या मार्गामुळेच तो आम्हाला सोडून गेला असे भावनिक उद्गार काढणाऱ्या तानी माझी आत्राम या जहाल नक्षल कमांडर साईनाथच्या आईने वर्षभरानंतर गट्टेपल्ली या स्वगावी मुलाची तेरवी केली. मात्र याच गट्टेपल्लीतील आठ कुटुंबांना आजही त्यांच्या मुलांची प्रतीक्षा आहे. या गावातील आठ मुले २२ एप्रिल २०१८ पासून बेपत्ता आहेत. साईनाथसोबत नक्षलवादी चळवळीत सहभागी होण्यासाठी गेलेले हे आठ जण कसनासूर-बोरीयाच्या चकमकीत ठार झाल्याचे सांगितले जाते.

छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात २२ एप्रिल २०१८ च्या पहाटे पाच वाजता कसनासूर-बोरीयाच्या जंगलात इंद्रावती नदीच्या पात्रात नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पेरीमिली दलम कमांडर साईनाथ, अहेरी दलम कमांडर नंदू व विभागीय समितीचा सदस्य सिनू यांच्यासह ४० नक्षलवादी ठार झाले. या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. दोन दिवसांपूर्वी गट्टेपल्ली येथे वास्तव्याला असलेली साईनाथची आई तानी माझी आत्राम व काका डुंगा इरपा आत्राम यांनी साईनाथची तेरवी साजरी केली. प्रस्तुत प्रतिनिधीने गेल्यावर्षी गट्टेपल्ली गावात साईनाथच्या आईची भेट घेतली तेव्हा तिला एकुलता एक मुलगा गमावल्याचे दु:ख होते. आता वर्षभरानंतर या गावात साईनाथच्या तेरवीच्या निमित्ताने  साईनाथ घेऊन गेलेल्या याच गावातील आठ तरूणांचा विषय पुन्हा चर्चिला गेला. पोलीस दलाच्या लेखी नक्षल चळवळीत हे आठही तरुण-तरुणी दाखल झाले होते आणि त्यांचा मृत्यूही त्याच चकमकीत झाला. मात्र या आठपैकी भूजी उसेंडी या एकाच तरूणीचा मृतदेह मिळाला. इतर सात युवकांचा अजूनही पत्ता नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आजही मुलांची प्रतिक्षा आहे. म्हणूनच या सात कुटुंबांनी अजूनही मुलांची तेरवी केलेली नाही. आम्ही, मुलांचे मृतदेहच बघितले नाही तर मुले दगावली यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा या सात कुटुंबांचा प्रश्न आहे. याला कारणही तसेच आहे. गडचिरोली पोलिसांनी ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही त्यांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा डीएनए रिपोर्ट आला की नाही यावर गडचिरोली पोलिस काहीही बोलायला तयार नाहीत.