19 January 2020

News Flash

गडचिरोलीतील शहिदांच्या कुटुंबीयांची अवहेलना

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ लाखांच्या मदतीपासून वंचित

|| रवींद्र जुनारकर

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ लाखांच्या मदतीपासून वंचित

जांभूळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात शहीद झालेल्या १५ जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची तातडीची मदत आणि नोकरीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत पूर्ण वेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांना मानवंदना देताना केली होती. या घोषणेला १८ दिवस होऊनही शहिदांची कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.

कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे १ मे महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे १५ जवान शहीद झाले. या दुर्घटनेनंतर २ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद जवानांना मानवंदना देताना त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ २५ लाखांची मदत आणि नोकरीच्या कालावधीपर्यंत पूर्ण वेतन देण्याची घोषणा केली होती.

पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीही पत्रकार परिषदेत शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ लाखांसह एकूण एक कोटीपेक्षा अधिक मदत मिळेल, त्याचबरोबर हल्ल्यात मृत्यू झालेला वाहनचालक तोमेश्वर सिंगनाथ याला शहीद दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांची २५ लाखांची मदत तर सोडाच साधी विम्याची रक्कमही मिळालेली नाही. परिणामी, या हल्ल्यात शहीद झालेल्या आरिफ तौसीफ शेख यांची पत्नी आणि दोन मुलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरक्षा विम्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे २० लाख रुपये मिळाले नसल्याचे शेख यांच्या पत्नीने पत्रकारांना सांगितले. याच स्फोटात शहीद झालेले पुरणशाह प्रतापशाह दुगा यांचा भाऊ किरणशाह दुगा यानेही मुख्यमंत्र्यांची २५ लाखांची मदत वा विम्याचे पैसे मिळाले नसल्याची व्यथा ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली.

एकीकडे शहीद जवानांच्या नावावर मते मागायची आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना करायची हा प्रकार अयोग्य असल्याची भावना शहिदांचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

‘मदतीबाबत माहिती घेऊ’

शहिदांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे सर्व विषय वरिष्ठ पातळीवरून हाताळले जात आहेत. मदत मिळाली नसेल तर याबाबत आपण माहिती घेऊ, असे गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले.

First Published on May 19, 2019 12:18 am

Web Title: families of the martyrs are deprived of help
Next Stories
1 राज्यातील उसाचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरने वाढले
2 कोणीही वंचित नसतं, जो वंचित म्हणेल तो बुझदिल – उदयनराजे भोसले
3 मुरुडच्या फणसाड धरणात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Just Now!
X