पुसदमध्ये पोलिसांच्या मारहाणीत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांच्या निषेधार्थ पुसदमध्ये शुक्रवारी सकाळी मोर्चा देखील काढण्यात आला असून या प्रकरणात पुसदच्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

पुसदमधील आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या भीमा हाटे (२१) या तरुणाविरोधात २९ एप्रिल रोजी एका तरुणीने छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. भीमा हाटेला जामिन मिळाल्याने त्याची सुटका देखील झाली. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे भीमा गंभीर जखमी झाला होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे होते. त्याच्यावर वर्ध्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि याचे पडसाद पुसदमध्ये उमटले. शुक्रवारी सकाळी नागरिकांनी पुसदमध्ये मोर्चा काढला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत पुसदचे पोलीस निरीक्षक अनिल गौतम यांची बदली केली.  तरुणाचा मृतदेह यवतमाळमधील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून रात्रीपर्यंत मृतदेह कुटुंबीयांकडे दिला जाईल, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.