News Flash

निमित्त दुष्काळाचे, लक्ष्य निवडणुकांचे!

दुष्काळी स्थितीवर विविध पक्ष संघटनांनी आठ-दहा मोच्रे काढून मदत करण्याची, जनावरांना चारा देण्याची मागणी केली. आंदोलन दुष्काळ जाहीर करण्यासाठी असले, तरी पुढाऱ्यांनी मात्र

| August 29, 2014 01:54 am

जिल्ह्य़ात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीवर विविध पक्ष संघटनांनी आठवडाभरात आठ-दहा मोच्रे काढून शेतकऱ्यांना मदत करण्याची, जनावरांना चारा देण्याची मागणी केली. आंदोलन दुष्काळ जाहीर करण्यासाठी असले, तरी पुढाऱ्यांनी मात्र राजकीय शक्तिप्रदर्शनाची संधी साधली. मोर्चाला गर्दी जमवून दुष्काळाची मागणी करताना सरकारवर हल्ला चढविला, राजकीय आव्हानाची भाषा केली. परंतु आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीआड निवडणुकांच्या मतांवर डोळा असल्याचे वास्तव लपून राहिले नाही.
जिल्हय़ात पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या स्थितीतही शक्तिप्रदर्शनाची संधी दवडणे नेत्यांना शक्यच नव्हते. प्रमुख विरोधी पक्षांसह विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांवर मोच्रे काढले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, जनावरांसाठी दावणीला चारा, बँकांकडून कर्जमाफी अशा सारख्याच  मागण्या आंदोलकांनी केल्या.
रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दुष्काळी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसोबत या वेळी जिल्हय़ातून रिपाइंचा आमदार करण्यासाठी साद घालण्याची संधी साधली. महायुतीत बीड व केज या दोन जागांवर दावा करून मोर्चाचा समारोप केला. नव्यानेच मनसेत दाखल झालेल्या माजी आमदार प्रा. सुनील धांडे यांनीही २०० बलगाडय़ांचा मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करताना बीड मतदारसंघातील निवडणुकीत उतरणार असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले. आष्टी तहसीलवर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर व बाळासाहेब आजबे यांनी दुष्काळी मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करीत महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना लक्ष्य केले. भाजपकडून इच्छूक तिघांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू असल्याने सर्वानीच दुष्काळी मोर्चात शक्तिप्रदर्शनाची संधी साधली.
शिवसंग्राम संघटनेचे राजेंद्र मस्के यांनीही ठिकठिकाणी मोर्चे काढून शक्तिप्रदर्शनात मागे नसल्याचे दाखवून दिले. अंबाजोगाईत शेतकरी कामगार पक्षाच्या डॉ. राजेश इंगोले यांनी मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांसह शिवसेना, भाजपवरही टीका केली. केज राखीव मतदारसंघातून इंगोले निवडणूक लढविणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. पाटोद्यातही कम्युनिस्ट नेत्यांनी गर्दी जमवली. हा पक्ष विधानसभेच्या ३ जागा लढणार असल्याने कॉ. नामदेव चव्हाण यांच्यासह भाकप, किसान सभा व शेतमजूर युनियननेही दुष्काळी मोच्रे काढले. इतरही छोटय़ा-मोठय़ा संघटनांनी दुष्काळी मोर्चानिमित्त रस्त्यावर येत राजकीय ताकद अजमावून पाहण्याची संधी साधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:54 am

Web Title: famine reason target election
Next Stories
1 महायुतीतील घटक पक्ष हिस्सा वाढीस सरसावले
2 परीट, मातंग, नाभिक समाज आरक्षणाच्या प्रश्नी सरसावले
3 आमदारांबद्दल गौप्यस्फोटानंतर अहवालासाठी हालचाली सुरू!
Just Now!
X