28 February 2021

News Flash

दुःखाला कवेत घेणारा गझलकार हरपला! इलाही जमादार यांचं निधन

सुरेश भटांनंतर मराठी गझलेला नेलं उत्तुंगतेच्या शिखरावर

गझलकार इलाही जमादार

‘आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते,’ असं म्हणत मानवी जीवनातील दुःख, वेदना शब्दबद्ध करणारे आणि आपल्या लेखणीनं मराठीतील गझलविश्व समृद्ध करणारा गझलकार आज काळाच्या पडद्याआड गेला. कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलेला शिखरावर नेणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांची वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली. ते ७५ वर्षांचे होते.

जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी झाला सांगलीतील दुधगाव येथे झाला होता. जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखन सुरू केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी कार्यक्रम केले. मराठी, हिंदी, उर्दू आदी दैनिकं आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता व गझल लिहिल्या.

नवोदित कवींसाठी इलाही गझल क्लिनिक नावाची गझल कार्यशाळाही घ्यायचे. सुरेश भट यांच्यानंतर इलाहींनी मराठी गझलेला उत्तुंगतेच्या शिखरावर नेलं. जुलै २०२० मध्ये ते तोल जाऊन पडले होते. यावेळी त्यांना जबर मार लागला होता. त्यातच वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रासही सुरू झाला होता.

इलाही जमादार यांच्या काही प्रसिद्ध रचना…

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे

रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही
दाही दिशा कशाच्या हा पिंजरा असावा

घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नसे हे दिवाण्याचे…

सहज बोलली, निघून गेली
झाले, गेले, विसरायाचे……

आरशात मी, आरशा-पुढे
कोण तोतया, समजायाचे….

ठरविल्याविना, ठरले आहे
स्वप्नामध्ये भेटायाचे….

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई

काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ
अफाट गर्दी मधे बिचारी चेंगरली मुंबई

हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले
प्रदूषणाने फास अवळला गुदमरली मुंबई

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला ‘इलाही‘ जाणवली मुंबई

अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर
छळेल तुजला तुझी वंचना माझ्यानंतर

सारे काही असून जवळी भणंग होशील
कळेल तुजला प्रीत-भावना माझ्यानंतर

अहंपणाचा फुशारकीचा नाद सोड तू
कोण तुझ्या ऐकेल वल्गना माझ्यानंतर

आजीवन तर तुझीच स्वप्ने रंगविली मी
येईल तुजला खरी कल्पना माझ्यानंतर

जिवापाड मी केली प्रीती अन तू छळले
असेल कोणी असा सांग ना! माझ्यानंतर

फुल ‘इलाहीच्या’ कबरीवर ये चढवाया
करावीस इतुकीच साधना माझ्यानंतर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 1:21 pm

Web Title: famous gazalkar ilahi jamadar passed away bmh 90
Next Stories
1 “जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का? याचं उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून ‘हा’ निर्णय मागे घ्या!”
2 नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात ५७ वर्षानंतर घडला इतिहास
3 “चिथावणी देणारे भाजपा परिवारातील निघावेत यासारखा विनोद तो कसला?”
Just Now!
X