ज्ञानपीठाचे पीठ खराब झाले आहे, त्यात अळ्या झाल्या आहेत. भालचंद्र नेमाडेंच्या सुमार कादंबरीला तो मिळतो असं वादग्रस्त वक्तव्य महाकवी सुधाकर गायधनी यांनी केलं आहे. नागपुरात ‘कब्रीतला समाधिस्थ’ या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. तब्बल ४६ वर्षानंतर या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. याच कार्यक्रमात बोलताना सुधाकर गायधनी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

“ज्ञानपीठाचे पीठ खराब झाले आहे, त्यात अळ्या झाल्या आहेत. भालचंद्र नेमाडेंच्या सुमार कादंबरीला तो मिळतो”, असं त्यांनी म्हटलं आहे. ते इतक्यावरच थांबले नाहीत. तर पद्मश्री गल्लीतल्या कोणालाही मिळतो असंही त्यांनी म्हटलं आहे. “पद्मश्री गल्लीतल्या कुणालाही मिळतो. मलाही विचारणा झाली होती, पण मी पद्मभूषण मागितले”, असा दावा सुधाकर गायधनी यांनी केला आहे.

“अनेकजण स्वतःला नामवंत कवी समजतात, पण कविता काय असते हे त्यांनाही कळत नाही. ती कविता विस्मृतीत जाते आणि कवी स्वर्गात जातो”, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान महाकवी सुधाकर गायधनी यांना सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाने अखिल भारतीय दलुभाऊ जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. १८ ऑगस्टला जळगाव येथे होणाऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय पंधराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.