प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे काम पाहतात. मागच्या काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्टही निगेटीव्ह आला होता.

पण औषध घेतल्यानंतरही त्यांचा ताप आणि खोकला कमी झाला नाही. चंद्रपूरमध्ये पुन्हा तपासणी करण्यात आली. तिथे वेगवेगळया चाचण्यांमधून त्यांना करोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर करोनाची साथ पसरली आहे.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे लोकबिरादरी प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. प्रकाश आमटे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी केले आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.