आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून घेतला गळफास

‘कर्जमाफी केवळ नावालाच झाली आहे. आपल्यासारखी वेळ इतरांवर येऊ नये हीच सरकारकडे हात जोडून प्रार्थना,’ अशी चिठ्ठी लिहून उमरगा तालुक्याती मुरुम येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मागील महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. मुलांच्या शिक्षणाचा आणि कौटुंबिक खर्चाचा मेळ काही केल्या बसेना. या अनिष्टातून बाहेर निघण्यासाठी मित्राकडे केलेली उधार उसनवारीही कामी आली नाही. त्यामुळे नराश्याच्या गत्रेत अडकलेल्या संभाजी खंडागळे या शेतकऱ्याचा कर्जबळी गेला आहे.

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील संभाजी खंडागळे हे मागील अनेक दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे हलाखीचे जीवन जगत होते. त्यातच मुलांच्या शिक्षणांचा वाढलेला खर्च आणि दैनंदिन चरितार्थाची साधने याची व्यवस्था करणे देखील जिकिरीचे झाले. मागील महिन्यात उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. त्यात खंडागळे यांच्या शेतीला फटका बसला होता. हातात आलेले पीक गारपिटीमुळे मातीमोल झाले आणि डोक्यावर बँकेच्या कर्जाचा डोंगर त्यामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या खंडागळे यांनी गुरुवारी रात्री टोकाचे पाऊल उचलले.

मुरुम परिसरात सजग नागरिक म्हणून परिचित असलेले खंडागळे यांनी आत्महत्या केल्याची वार्ता कळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुरुम पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी आढळल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाइकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

काय लिहिले आहे चिठ्ठीत?

‘आम्ही दोघे भाऊ. संभाजी आणि नेताजी. दोघांत १३ एकर जमीन. त्यातील दहा एकर साठवण तलावात गेली. मावेजापोटी तुटपुंजी रक्कम मिळाली. न्यायालयात प्रकरण सुरू आहे. मात्र, न्यायालय आणि वकिलाच्या दिरंगाईमुळे जीव मेटाकुटीला आलेला आहे. एकुलता एक मुलगा उस्मानाबादेत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षांत शिकत आहे. पाच वर्षांपासून त्याचा आणि घरप्रपंचाचा खर्च करताना कसरत होत आहे. जिल्हा बँकेचे एक लाख ८३ हजार, महाराष्ट्र बँकेचे एक लाख, उमरगा जनता बँकेचे दोन लाख आणि मित्रपरिवाराकडून हातउसने घेतलेले एक लाख ५० हजार कसे फेडायचे? अतिविचाराने मानसिक त्रास होत आहे, रात्री झोप येत नाही. कर्जमाफी नावालाच झाली आहे. आपल्यासारखी वेळ इतरांवर येऊ नये हीच सरकारकडे प्रार्थना. कुटुंबातील सदस्याकडे नातेवाइकांनी लक्ष द्यावे ही नातेवाइकांना विनंती.

मित्रपरिवाराकडे केली होती याचना

महिनाभरापासून मित्र परिवाराजवळ डोक्यावर कर्जबोजा झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याने, काहीतरी मार्ग काढण्याची विनंती केल्यावरून लवकरच सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन काहीतरी यावर उपाय काढण्याचे ठरले होते. परंतु तत्पूर्वीच संभाजी यांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केल्याने मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.