शेतकऱ्याच्या इशाऱ्याची मंत्र्यांनी दखल न घेतल्याचा आरोप

वाशीम जिल्ह्यतील शेतकऱ्याने समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांना २७ नोव्हेंबरला निवेदन देऊन व चर्चा करून आत्महत्येचा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्याची दखल न घेतल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळ यांनी ६ डिसेंबरला यवतमाळ येथे आत्महत्या केली, असा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे.

वाशीम जिल्ह्य़ातील सोयजना येथील ज्ञानेश्वर नारायण मिसाळ यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळ येथे बुधवारी जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, मिसाळ यांनी २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात जाऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेतली आणि आपली समस्या मांडल्याची माहिती गावातील शेतकऱ्यांनी दिली. यावेळी त्यांनी आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला, मात्र त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे निराश होऊन मिसाळ यांनी आत्महत्या केल्याचे गावातील शेतकरी म्हणाले.

ज्ञानेश्वर मिसाळ यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यामध्ये आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख, मिहद्रा फायनान्सचे अडीच लाख आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दीड लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांनी खासगी कर्जही घेतले होते. ज्ञानेश्वर मिसाळ यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यातील संत्रा बाग पावसाअभावी सुकली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मुलांना व इतरांना चार पत्रे लिहून ठेवली आहेत. दरम्यान, ज्ञानेश्वर मिसाळ यांचे जिल्हास्तरावर कोणतेही निवेदन प्राप्त झाले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मोडनिंबमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर : माढा तालुक्यातील मोडनिंब येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. सचिन बबन गिड्डे (वय ३८) असे त्याचे नाव आहे. राज्य शासनाने एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार घडतच आहेत. याच मालिकेत मोडनिंब येथे सचिन गिड्डे या शेतकऱ्याने शेतातील नापिकी व खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येईना म्हणून निराश होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. मोडनिंब परिसरात अलीकडे सातत्याने अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. यात सचिन गिड्डे याच्या शेतातील पिकांचेही नुकसान झाले. दुसरीकडे एका खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेने त्याला ग्रासले होते. त्यातून त्याने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. टेंभुर्णी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.