तालुक्यातील गणौरे येथील बढे वस्तीत सोमवारी एका शेतकरी कुटुंबातील चौघांचे गळफास घेतलेले मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी तसेच अपंग मुलाच्या आजारास कंटाळून बाबाजी विठ्ठल बढे या शेतकऱ्याने पत्नी, मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करीत गळफास दिला आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन संपूर्ण कु टुंब संपवून टाकले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

बाबाजी बढे (४०) यांची पत्नी कविता (वय ३५) गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. थोरला मुलगा आदित्य (१६) हा जन्मत: अपंग होता. त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. पत्नीवरही औषधोपचार सुरू असल्याने शेती तसेच दुग्ध व्यवसायही एकटय़ानेच करावा लागत होता.

शेतीच्या कामाबरोबरच कुटुंबाच्या स्वयंपाकाची जबाबदारीही त्यांच्यावरही होती. त्यांचा धाकटा मुलगा धनंजय (१४) हा सातव्या इयत्तेत शिकत होता. घरातील तणावावर मात करून त्याने सहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळविले होते.

शेती, दुग्ध व्यवसाय तसेच घरातील कामे व पत्नी, मुलाच्या आजारामुळे बाबाजी बढे हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. रविवारी दिवसभर शेतीची कामे उरकल्यानंतर त्यांनी मुले तसेच पत्नीसाठी वडापाव आणले. रात्रीचे जेवणही बनवले. रात्री कुटुंबाने एकत्र जेवण केले. बाबाजी याने जेवणात किंवा वडापावमध्ये गुंगीचे अथवा तत्सम औषध टाकून तिघांना बेशुद्ध केले. त्यानंतर तिघांनाही गळफास दिला. त्यापाठोपाठ स्वत:नेही गळफास घेत संपूर्ण कुटुंबाची जीवनयात्रा संपविली. सकाळी दूध घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना बाबाजी यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने एकाने खिडकीतून डोकावले असता एका रांगेत चारही मृतदेह आढळून आले.

पोलिसांशी संपर्क केल्यानंतर निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चारही मृतदेह खाली उतरवून पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अन्नातून विषबाधा झाली किंवा नाही हे तपासण्यासाठी नाशिकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन अन्नाचे नमुने घेण्यात आले.