पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहून तालुक्यातील भादली येथील शेतकऱ्याने घरात दोरीने गळफास घेतला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्रभाकर पांडूरंग कोळी (५७) हे पत्नी भारती, मोठा मुलगा निखिल आणि सूनेसह शेती करीत होते. लहान मुलगा अमोल हा कापड दुकानावर कामाला आहे. यंदा त्यांनी शेतात उडीद, कापसाची लागवड केली होती. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यातच त्यांनी उडिदाची कापणी केली. परंतु, पावसामुळे त्यांचेही नुकसान झाले. नुकसानीमुळे काही दिवसांपासून कोळी चिंतेत होते. शुक्र वारी पत्नी, मोठा मुलगा आणि सून शेतात, तर लहान मुलगा अमोल हा दुकानावर कामाला गेला असतांना घरी कोणीही नसल्याचे पाहून दुपारी राहत्या घरात कोळी यांनी दोरीने गळफास घेतला. सायंकाळी पत्नी आणि मुलगा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रभाकर हे गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.