सांगली : कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत मिरज तालुक्यातील बेडग येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, की मिरज तालुक्यातील बेडग येथील महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२)  या शेतकऱ्याने पानमळ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

मृत नागरगोजे यांनी २०१२ मध्ये एका व्यापारी बँकेचे पानमळ्यासाठी १ लाख ९२ हजाराचे कर्ज काढले होते. यापकी १ लाख ४२ हजारांची परतफेडही केली होती. मात्र, थकीत कर्जासाठी त्यांना बँकेकडून तगादाही लावण्यात आला होता. या संदर्भात बँकेची नोटीसही आली होती.

पानमळ्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची याच्या विवंचनेत ते होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे पानमळ्यामध्ये वेल बांधणीसाठी जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. बराच वेळ ते परत आले नाहीत म्हणून मुलगा अप्पासाहेब नागरगोजे यांनी मळ्यात जाऊन पाहिले असता पानमळ्यात त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.