सात लाखांचे कर्ज डोक्यावर असतानाच यंदा दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेत भर पडल्याने हिंगोलीतील शेतकऱ्याने रविवारी आत्महत्या केली. भगवान माने (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून यंदा दुष्काळामुळे पिके वाळून गेल्याने माने तणावाखाली होते.

सेनगाव तालुक्यातील खांबासिनगी या गावात राहणारे भगवान माने यांची सोळा एकर शेती आहे. यातील पाच एकर शेती त्यांच्या नावे तर इतर शेती कुटुंबाच्या नावावर आहे. या शेतीवर माने यांनी २०१६ मध्ये सुमारे सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदा पावसाअभावी मराठवाड्यात भीषण परिस्थिती आहे. माने यांनाही पावसाने पाठ फिरवल्याचा फटका बसला होता. माने यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके वाळून गेली होती. लागवडीचाही खर्च न निघाल्याने माने यांच्या चिंतेत भर पडली. या नैराश्यातूनच माने यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. रविवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही हिंगोली जिल्ह्यातील येडूत येथे दामोदर घुगे (वय ४२) या कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. मराठवाड्यातील ४७ तालुक्यांत दुष्काळाची दाहकता भीषण असून चारापाण्यासाठी दुष्काळग्रस्त हतबल झाले आहेत. राज्यात खरीप पिकांचे ऊसासह सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून यंदा ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी, लागवड झाली आहे. मात्र दुष्काळामुळे ही पिके शेतातच वाळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.