फलटण तालुक्यातील वाजेगाव येथे शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून तरुण शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला.

वजेगाव (ता. फलटण )गावच्या हद्दीत पुणे-पंढरपूर पालखी मार्गालगत मतकर वस्तीवरील दीपक रत्नसिंह मतकर (वय ३५ )व त्यांची पत्नी योगिता (वय ३०) सकाळी आठच्या सुमारास शेतात गुरांना चारा आणण्यासाठी जात होते. रस्त्यात उसाच्या शेतावरील बांधावर तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दीपक मतकर याचे चुलते दुसऱ्या शेतातील गवत घेऊन घरी जात असताना त्यांना दोघेही अत्यवस्थ पडलेले दिसता जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता जमिनीत विद्युत प्रवाह असल्याचे त्यांच्या लक्षत आले.त्यांनी वस्तीवर जाऊन ही माहिती दिली.

युवकांना डीपी बंद करुन दोघांना उठविण्याचा प्रयत्न केला असता दोघेही मृत झाल्याचे दिसून आले.सकाळीच विजेची तार तुटल्याची खबर विद्युत विभागास देण्यात आली होती.उशिरापयर्ंत वीज कर्मचारी न आल्याने व विद्युत प्रवाह सुरु राहील्याने ही घटना घडली.दीपक व योगिता मतकर हे अल्पभूधारक शेतकरी होते.त्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता.त्यांना दोन मुले असून मुलगी दहावीत तर मुलगा सातवी इयत्तेत शिकत आहेत.घटनास्थळी फलटणचे तहसीलदार विजय पाटील यांनी भेट दिली.त्या वेळी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल रोष व्यक्त केला.सदर निराधार मुलांचा संजय गांधी निराधार योजनेत समावेश करण्यात येईल, तसेच महावितरणकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.