वार्ताहर, उमरगा

दगडफेक प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाने दरवाजा तोडून केलेल्या मारहाणीत ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड या गावी बुधवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. पहाटेपासूनच मयत दत्तू मोरे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मद्यप्राशन करुन कारवाई करणाऱ्या पोलिसांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी चारचाकी गाडीचा अपघात झाला. त्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे त्यात दोघांचा भाजून मृत्यू झाला होता. वेळेवर अग्निशमन दलाची गाडी न आल्याने संतप्त गावकऱ्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक केली होती. पोलिसांनी याप्रकरणी २५ ते ३० अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी उमरगा पोलीस ठाण्यातील पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर तलमोड गावात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. गाढ झोपेत असलेल्या गावकऱ्यांनी घराचे दरवाजे तोडून झोडपून काढले. याच गोंधळात झालेल्या मारहाणीमुळे दत्तू मोरे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मध्यरात्रीनंतर बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी काढता पाय घेतला. अचानक झालेल्या पोलिसांच्या हल्ल्यामुळे बिथरलेल्या आणि मोरे यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मृतदेह घेवून पहाटे पाच वाजेच्या सुमारास थेट पोलीस ठाणे गाठले. मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून आपल्यावर अन्याय करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. गावातील शेकडो महिला आणि पुरुष पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातात मयत झालेल्या तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील पोलिसांनी मारहाण केली असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.