एकीकडे पीकविमा भरण्यासाठी शेवटची तारीख असल्याने आधीच डोक्यावर ताण असताना दुसरीकडे सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठय़ाकडे गेल्यानंतर आपले नावच सातबारावरून वगळले आहे, याचा धक्का बसल्याने पाथरी येथे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. शेतकऱ्याचा मृतदेह पाथरी येथील सरकारी रुग्णालयातून तहसील कार्यालयात नेण्यासाठी शेतकऱ्यांनी या वेळी आग्रह धरला. त्यामुळे सायंकाळी सरकारी दवाखान्यातही मोठा तणाव निर्माण झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक (वय ५५) हे पीकविमा भरण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे आले असता आपल्या गट क्रमांक १३१ मधील स्वतच्या मालकीचा सातबारा आणण्यासाठी ते तुरा या सज्जाच्या तलाठय़ांच्या खासगी कार्यालयात गेले.

आपल्या सातबाराची मागणी त्यांनी या वेळी केली असता तलाठय़ाने तुमचे नाव सातबारावर नसल्याचे सांगितले. याचा चाळक यांना धक्का बसला. यानंतर चाळक यांनी थेट तहसील कार्यालय गाठले व तिथे आपल्यावरील अन्यायाची तोंडी तक्रार केली.

पुन्हा जेव्हा चाळक हे तलाठय़ाकडे गेले तेव्हा आपले नाव सातबारावरून वगळल्याचे त्यांना कळाल्यानंतर त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पाथरी ग्रामीण रुग्णालयात या शेतकऱ्यास आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चाळक यांना मृत म्हणून घोषित केले.

या सर्व प्रकारानंतर चाळक यांच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रुग्णालयात मृत म्हणून घोषित केल्यानंतरही शेतकऱ्यांसह चाळक यांच्या नातेवाइकांनीही त्यांचे प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला. या वेळी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या.

चाळक यांचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी धरला. परिणामी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरही हबकून गेले. त्याचवेळी शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी दवाखान्यात जमा झाली. सायंकाळी उशिरापर्यंत या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर सरकारी दवाखान्यात तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी आंदोलक शेतकरी, कार्यकत्रे यांची गर्दी झाली होती. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीही तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer dies pathri parbhani abn
First published on: 24-07-2019 at 01:18 IST