जिल्ह्यातील पडेगाव, रूमणा, दैठणा व चिकलठाणा शिवारात रस्त्याकडेला शेतातील पिकांची पाहणी करून केंद्रीय पथकाने धावता दौरा पूर्ण करून जालन्याकडे प्रयाण केले. जिल्ह्यात ३ तालुक्यांतील ४ गावांना भेटी देऊन दुष्काळावर जुजबी चौकशी केल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह, सुरेंद्रसिंग, ए के सिंग, पवनकुमार या अधिकाऱ्यांचे सकाळी लातूरहून साडेदहाच्या सुमारास परभणीत आगमन झाले. सुरुवातीला गंगाखेड तालुक्यातील पडेगावला भेट दिली. शेतकऱ्यांना अल्पदरात धान्य, टँकरने पाणीपुरवठा, कर्जमाफी, रब्बीसाठी मोफत बी-बियाणे व खतपुरवठा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दहा मिनिटांत पथक रुमण्यास निघाले. वाटेत रुमणा पाटीनजीक भानुदास सोळंके, जनार्दन सोळंके, माणिक सोळंके आदी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली. पथकाच्या प्रतीक्षेत ४०० ते ५०० शेतकरी रुमणा पाटीवर थांबले होते. येथेही १० मिनिटे पथकाने वेळ दिला.
परभणी तालुक्यातील दैठणा ते पोखर्णी दरम्यान डिगांबर कच्छवे यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी करून पेरणी कधी केली, सध्या कशी स्थिती आहे, अशा जुजबी प्रश्नांची सरबत्ती करून पथक सेलूस रवाना झाले. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी चाऱ्याचा प्रश्न, दुबार पेरणी, पीकविमा, पिण्याची समस्या अशी गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने शेतकऱ्यांना बोलण्यास फारसा वेळ न देता काढता पाय घेतला. सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथेही भेट देऊन पथक जालन्यास रवाना झाले. आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. टी. कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. के. दिवेकर आदी अधिकारी उपस्थित होते.