News Flash

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप

सुरुवातीला दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या, पण आता पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पेरलेले उगवण्याइतपत पाऊस झाला असला तरीही जमिनीतली ओल आटल्याने

| June 29, 2015 01:10 am

सुरुवातीला दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या, पण आता पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पेरलेले उगवण्याइतपत पाऊस झाला असला तरीही जमिनीतली ओल आटल्याने आता उगवलेल्या अंकुरांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उंबरठय़ावर आले असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी मात्र पुरता धास्तावला आहे.
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना समाधान लाभले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरण्यांनाही प्रारंभ केला. मोठय़ा प्रमाणावर जिल्ह्यात पेरण्याही झाल्या. कापसाची लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली ते आता धास्तावले असून पुन्हा कापूस लागवडीची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचबरोबर मूग, सोयाबीन यासारखे बियाणे शेतकऱ्यांनी पेरले. पण आता या पिकांचे भवितव्य संकटात सापडले आहे. सुरुवातीला जमिनीत ओल होती त्यामुळे पेरण्या झाल्या. जमिनीत ओल असल्याने पेरण्यांचा वेगही खूप होता. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यातल्या पेरण्या लवकर आटोपल्या. काही अपवाद वगळता जिल्ह्यात आता बहुतांश ठिकाणी पेरणी झालेली आहे. ही पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याला दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र असा पाऊस आता दडी मारून बसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
मागची तीन वष्रे नापिकी झाल्याने शेतकरी आधीच संकटात सापडलेला आहे. अशावेळी पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा दुबार पेरणी करावी लागते की काय, या काळजीने ग्रासले आहे. महागाचे बियाणे पेरून मोकळा झालेला शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पावसाची नक्षत्रे कोरडी जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2015 1:10 am

Web Title: farmer disturb due to close rain
टॅग : Parbhani
Next Stories
1 सावंतवाडी भूमिपूजनप्रसंगी सेना-भाजपची घोषणाबाजी
2 लोहमार्गासाठी १० हजार कोटी
3 ‘पुरोहित प्रकरणामुळे भाजपमधील असंतोष उघड’
Just Now!
X