भूम तालुक्याच्या डोंगराळ भागात माथ्यावर उभारल्या जात असलेल्या पवनचक्क्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवनचक्क्यांमुळे पावसावर काही प्रतिकूल परिणाम तर होणार नाही ना, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
बालाघाटच्या कुशीत असलेल्या या तालुक्यात वहिवाटीखालील जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाणही कमीच आहे. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उन्हाळ्यात तालुकाभर जाणवतो. या भागामध्ये शेती प्रमुख व्यवसाय असला, तरी त्यास जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही शेतकरी करतात. दुधापासून खवा तयार करण्याचे उद्योग तालुक्यात सर्वदूर मोठय़ा प्रमाणात चालतात. हे दोन्ही व्यवसाय मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहेत. पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ तालुक्यातील बहुतांश गावांवर येते.
तालुक्यातील डोंगराळ भागात गावांच्या परिसरातील शेतजमिनी काही पवनचक्की मालकांनी विकत घेऊन पवनचक्क्या उभारण्याची कामे हाती घेतली आहेत. अत्यंत कवडीमोल किमतीने खरेदी केलेल्या जमिनीवर मोठ-मोठे पवनचक्कीचे मनोरे उभारले जात आहेत. ज्या जमिनीतून काही उत्पन्न हाती लाभत नाही, अशा जमिनी चार पसे हाती येतील या उद्देशाने शेतकऱ्यांनी पवनचक्कीवाल्यांना विकल्या.  
हिवरा, हाडोंग्री, दिडोंरी आदी भागात आजपर्यंत १२ पवनचक्क्यांची उभारणी पूर्ण होऊन त्या सुरूही झाल्या. उर्वरित १० ते १२ पवनचक्क्यांची कामे वेगाने चालू आहेत. परंतु या पवनचक्क्यांच्या मोठय़ा पात्यांमुळे ढग कापले जाऊन त्यांच्या हवेमुळे या भागातील ढग पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अलीकडच्या काळात बीड शहराजवळील िबदुसरा प्रकल्प प्रत्येक पावसाळ्यात पूर्ण न भरल्याचे पाहावयास मिळते. पाटोदा भागातील पवनऊर्जा प्रकल्पाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. भूम तालुक्यातही पवनचक्क्यांमुळे पावसाचे प्रमाण घटले जाऊन देशोधडीला लागण्याची वेळ ओढवणार काय, याची चिंता शेतकऱ्यांमध्ये लागून आहे.