जूनचा तिसरा आठवडा सरला तरी पावसाची दडी कायम असून जिल्हय़ात खरीप पेरणीस अजूनही प्रारंभ झाला नाही, मात्र पेरणी न करताही प्रायोगिक तत्त्वावर पीकविमा योजना लागू होणार असल्यामुळे जिल्हय़ातील शेतकऱ्यांना तेवढाच दिलासा मिळणार आहे.
मृग नक्षत्रात देवणी वगळता एकाही तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. देवणीत १२० मिमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला आहे. उर्वरित नऊही तालुक्यांत पुरेसा पाऊस नसल्यामुळे पेरणीचे धाडस कोणी करीत नाही. जिल्हय़ात खरिपाचे ५ लाख ३३ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. मृग नक्षत्रात पाऊस न झाल्यामुळे उडीद व मुगाचा पेरा जवळपास होणारच नाही. सोयाबीन, तूर पिकांवरच शेतकरी भर देणार असल्याचे दिसते. सोयाबीनच्या पेऱ्यात गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी वाढ होत आहे. याही वर्षी साडेतीन लाख हेक्टरच्या आसपास सोयाबीनचा पेरा होईल, असा अंदाज आहे.
२० जूनअखेर तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी मिमीमध्ये : लातूर २४.१३, औसा २१.५७, रेणापूर २०.४०, उदगीर ३९.०९, अहमदपूर ४९.६६, चाकूर ५२, जळकोट २५.५०, निलंगा ५३.८२, देवणी १२०.९९, शिरूर अनंतपाळ ९२.९३.
उशिरा पेरा झाला तरी सोयाबीनचे उत्पादन घेता येऊ शकते. शेतकरी आता पावसाची वाट पाहात आहेत. या वर्षी हवामान आधारित पीकयोजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. ३० जूनपर्यंत पेरणी झाली नसली तरी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भरता येणार आहे. सोयाबीन, उडीद व मूग यासाठी ही योजना असून, सोयाबीनसाठी १९ हजार विम्याची हमी आहे. त्यासाठी केवळ ४.८० टक्के हप्ता भरावा लागणार आहे. उडीद, मुगासाठी १५ हजार रुपये व हप्ता ४.४३ टक्के आहे. ज्वारीसाठी विम्याची हमी १५ हजार, तर हप्ता ४.८३ टक्के राहणार आहे.
बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत जिल्हय़ात ही योजना कार्यान्वित होणार आहे. महसूल मंडळ क्षेत्रघटक धरून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ३० जूनअखेर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी केले आहे.