पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला असतानाच पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. कृष्णा कोरडी पडू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणातून शनिवारपासून प्रतिसंकेद ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येत्या ७२ तासासाठी सुरू करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील ८३ तलावात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून ४८ तलाव ऐनपावसाळ्यात कोरडे पडले आहेत.
यंदाच्या हंगामातील मृगनक्षत्र पूर्णपरणे कोरडे गेले असून सांगली जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या कोयना, धोम, कणेर, वारणा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यापासून २९ टक्क्यांपर्यंतच पावसाने हजेरी लावल्याने अपेक्षित जलसंचय झालेला नाही. कोयना धरणात शनिवारअखेर अपयुक्त पाणीसाठा ९ टक्के असून इतर धरणांतील पाणीसाठा पुढील प्रमाणे आहे- धोम ११, कणेर २८, वारणा १९, मागील वर्षी याच कालावधीत कोयनेतील उपयुक्त जलसाठा ४६, धोम २६, कणेर ४२ तर वारणा २ टक्के होता. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षी आजअखेर कोयना १४२४, महाबळेश्वर १४८७, नवजा १४५०  मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली होती. मात्र चालूवर्षी शनिवारअखेर या ठिकाणी अनुक्रमे ४१८, १९५ आणि ४४३ मिलिमीटर इतक्या अल्प पावसाची नोंद झाली असल्याची माहिती सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून मिळाली. यामुळे यंदाच्या हंगामात धरणातील पाणीसाठा अपेक्षितप्रमाणे झाला नसल्याने कृष्णेचे पात्र कोरडे पडले आहे.
सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य गावांना कृष्णा नदीतून उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने संभाव्य आणीबाणी लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून कोयना धरणातून प्रतिसेकंद ६०० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. हे पाणी येत्या ७२ तासांसाठी सोडण्यात येणार असून ३० जून रोजी हे पाणी पुन्हा बंद करण्यात येणार आहे. या पाण्यातून नदी पात्रातील बंधारे भरून घेण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी व्हावा याकरिता नदीकाठच्या शेतीच्या पाणी योजना बंद ठेवण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत.
पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ८३ मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पापकी ४८ तलाव कोरडे पडले असून यामध्ये तासगांव ४, खानापूर ५, कडेगांव १, शिराळा ३, कवठेमहांकाळ ६, जत १८, आटपाडी ७, मिरज २ आणि वाळवा २ तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ८३ तलावात ९ हजार ३९८.७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा करण्याची क्षमता असताना आजच्या घडीला केवळ १७२३.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. जत, कवठेमहांकाळ, कडेगांव, तासगांव व आटपाडी तालुक्यातील काही तलावात म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी पाणी योजनेतून पाणी भरून घेतले असल्याने पाण्याची टक्केवारी वाढली असली तरी प्रत्यक्षात पाऊस नसल्याने परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे.