हिंगोली तहसीलच्या आवारात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याची हत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सीताराम राऊत (वय ६१) असे या हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून रंगनाथ मोडे असे हल्लेखोराचे नाव आहे. रंगनाथ आणि राऊत यांच्यात शेतजमिनीचा वाद होता.

बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास हिंगोली तालुका दंडाधिकारी न्यायालयात पहेणी येथील रंगनाथ मोडे व सवड येथील सीताराम राऊत यांच्यातील जमिनीच्या वादावर सुनावणी होती. राऊत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असतानाच रंगनाथने राऊत यांच्या मानेवर कोयत्याने वार केला. यात गंभीर जखमी झालेले राऊत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती शिपायाने नायब तहसीलदार बोथीकर यांना दिली. बोथीकर यांनी बाहेर येऊन सीताराम यांना नेमके काय घडले, असे विचारले. यानंतर सीताराम राऊत यांच्या तोंडून ‘रंगनाथ मोडे पहेणी याने मारले’ हे शब्द बाहेर पडले. यानंतर राऊत यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत राऊत यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांचा पंचनामा सुरु असताना आरोपी रंगनाथ हा काही वेळाने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.