लोकसभा निवडणुकीत हातकणंगले या मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज येथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाहून अधिक मताने मात केली. शेट्टी यांनी साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक, नवमतदारांनी माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, माने यांची मराठा जात आणि त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा यामुळे माने यांची बाजू भक्कम झाली होती. याचा फायदा त्यांना निवडणुकीतही झाला.

या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. या भेटीचे छायाचित्र मनसेच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सोमवारी राजू शेट्टी यांनी पराभवाच्या पार्श्वभूमीवर कवितेच्या माध्यमातून खचून न जाता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इरादा व्यक्त केला होता. ‘आजपासून..’ या शीर्षकाच्या कवितेद्वारा शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी नसलो तरी चळवळीला बांधील असून मी संत नाही शांत आहे ,गोतावळ्यातून दुरावलो ,याची मनात खंत आहे, असे म्हटले होते.