राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात साखर कारखानदार अपयशी ठरले आहेत. अशा साखर कारखानदारांवर हे सरकार कारवाई करत नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एफआरपी मिळाला पाहिजे. आज दोन वेळा शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. तरी देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. यातून या सरकारची भूमिका लक्षात येते. त्यामुळे आता काही झाले तरी साखर संकुला समोरुन हटणार नाही अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा योगेंद्र यादव तसेच राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. तर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हा मोर्चा तीन वाजण्याच्या सुमारास साखर संकुलावर धडकला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीची दोन वेळा साखर आयुक्तासोबत चर्चा देखील झाली. या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने राजू शेट्टी यांनी जागेवरून कोणत्याही परिस्थितीमध्ये हटणार नाही अशी भूमिका त्मांडली. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पोलिसानी बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली.