वीज खांब उभारणीसाठी आलेल्या ८५० रुपयांचा खर्च मागितल्याच्या कारणावरून शेजारच्या शेतकऱ्यावर नऊ जणांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यातील औंढी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन महिलांसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश मारुती ढोणे (३७) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पांडुरंग अंकुश सूळ, विष्णू सूळ, पांडुरंग सूळ याची आई, विष्णू सूळ याची पत्नी तसेच सुभाष ज्ञानोबा सोलकर (रा. औंढी) तसेच अर्जुन पांडुरंग मदने व संजय श्यामराव मदने (रा. पुळूजवाडी, ता. पंढरपूर) यांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत.  गणेश ढोणे व आरोपी विष्णू सूळ यांची शेतजमीन एकमेकास लागून आहे. शेतातील विहीर समाईक आहे. अलीकडे वादळी वाऱ्यामुळे शेतातील विद्युत खांब उन्मळून कोसळले होते. त्यामुळे विहिरीवरील विद्युत मोटारीचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. तेव्हा गणेश ढोणे याने वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेमार्फत वीज खांब सरळ उभारून घेतला होता. त्यासाठी झालेल्या खर्चातील ८५० रुपयांचा हिस्सा सूळ यांनी भरायचा होता. त्याप्रमाणे गणेश याने ८५० रुपये मागितले असता सूळ कुटुंबीयांनी त्याच्याशी वाद घातला. तू आमच्या शेतात यायचे नाही, असे म्हणून त्याच्या डोळय़ांत मिरचीची पूड टाकून लोखंडी सळई, काठी व दगडाने हल्ला केला. यात त्याच्या डोक्यास गंभीर जखम झाली. त्यास गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मामा गजानन चौगुले याने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच गणेश याचा मृत्यू झाला.

महिलेस छेड काढून मारहाण

मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द या गावात वाईट नजरेने बघणाऱ्या तरुणाला जाब विचारल्याचा राग मनात धरून एका ३० वर्षांच्या महिलेला दोघा भावांनी काठी व लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाली. या प्रकरणी महादेव अगतराव माळी व त्याचा भाऊ दीपक अगतराव माळी यांची नावे संशयित म्हणून पोलिसांनी नोंद केली आहेत. जखमी महिलेवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.