01 March 2021

News Flash

शेतकऱ्यांच्या ‘नाईट लाईफ’चीही चिंता करा

शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याशिवाय आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याशिवाय शेतीचा शाश्वत विकास होणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले.

संग्रहीत

 

विरोधी पक्षनेते फडणवीस यांची सरकारवर टीका

परभणी: वॉटर ग्रीडसह अनेक योजनांना स्थगिती देण्याचा सरकारचा इरादा दिसून येत आहे. एखादे काम करायचे नसेल तर जाणीवपूर्वक तांत्रिक गोष्टी सांगून बहाणे केले जातात. सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. मुंबईत ‘नाईटलाईफ’ सुरू करून श्रीमंतांच्या पोरांची चिंता  सरकारने दूर केली, पण या सरकारने  शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’चीही चिंता करावी, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. आधीच्या सरकारने सुरू केलेले कल्याणकारी उपक्रम बाजूला ठेवले तर विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या वेळी माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, गजानन घुगे, विजय गव्हाणे, ‘वनामकृवि’चे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विठ्ठल रबदडे, गणेश रोकडे,  सुभाष कदम, आनंद भरोसे आदी उपस्थित होते.

शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याशिवाय आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याशिवाय शेतीचा शाश्वत विकास होणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले. मागील सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि या सरकारनेही कर्जमाफी जाहीर केली. मात्र,  कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या अरिष्टावर अंतिम उपाय नाही, असे सांगून त्यांनी ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून झालेल्या कामांना उजाळा दिला. नानाजी देशमुख यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या योजनेतून चार हजार गावांमध्ये चार हजार कोटी रुपयांच्या योजनांना चालना दिल्याने या गावांमधील शेती शाश्वत होईल, असेही ते म्हणाले.  लोणीकर यांनी आपल्या भाषणात वॉटर ग्रीड प्रकल्पाचा उल्लेख केला होता, त्यावर बोलताना फडणवीस यांनी इस्राएलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा प्रकल्प आखला गेला आहे. पाच जिल्ह्यांच्या निविदाही निघाल्या. मात्र, या प्रकल्पाला सध्याच्या सरकारने स्थगिती दिल्याची चर्चा आहे. योजनेत काही बदल करायचे असतील तर ते जरूर करावेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत ‘वॉटर ग्रीड’चे काम थांबविण्यात येऊ नये, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.  कुलगुरू डॉ. ढवण यांनी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या संशोधनाची माहिती दिली. नांदेड ४४ या कापसाच्या वाणाचे आता बीटी बियाणे उपलब्ध झाले असून पावसाचा ताण सहन करणारी बियाणे आता येत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील तुरुकमाने यांनी केले.

आम्हाला विचारा, सल्ला देऊ!

वॉटर ग्रीडसाठी पसा कुठून आणायचा, असा प्रश्न जर सरकारसमोर असेल तर आम्ही नक्कीच सल्ला देऊ. आमच्यापेक्षा फार हुशार लोक सरकारमध्ये बसले आहेत. आमच्या सल्ल्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. तरीही आम्हाला विचारले तर आम्ही नक्की सल्ला देऊ, असे फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 2:12 am

Web Title: farmer nightlife devendra fadnavis farmer problem akp 94
Next Stories
1 शोध पत्रकारितेची आज गरज – डॉ लहाने
2 वाढत्या वीजनिर्मिती खर्चाचा महानिर्मितीच्या उत्पादनाला फटका
3 हिंगणघाट घटनेनंतर संयमाचे दर्शन!
Just Now!
X