News Flash

उस्मानाबादेत शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल

शेतकर्‍यांना सुमारे ३१३ कोटीचा फटका बसला

Farmers crisis
प्रतिनिधिक छायाचित्र

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावूनही अनेक ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. जिल्ह्यातील नऊ हमीभाव खरेदी केंद्रावर आजवर खरेदी करण्यात आलेले धान्य आणि एकूण उत्पादन याचा ताळमेळ घातल्यास शेतकर्‍यांना सुमारे ३१३ कोटी रुपयाचा खड्डा पडला आहे. दुष्काळानंतर हातात पडलेला माल कमी दराने विकावा लागत असल्याने शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल अशी परिस्थिती आहे.

जिल्ह्यात मागील दशकभरापासून सोयाबीनच्या लागवडीने वेग धरला आहे. यंदा २ लाख ३७ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार २३ लाख ८५ हजार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ५० रुपये आणि बाजारभाव १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयापर्यंत आहे. सरकारने केवळ १ हजार क्विंटल सोयाबीन हमीभावाने खरेदी केले. उर्वरित २३ लाख ८४ हजार क्विंटल सोयाबीन शेतकर्‍यांना व्यापार्‍यांच्या घशात घालावे लागले. सरासरी दोन हजार रुपये क्विंटलने खरेदी झाली. सोयाबीन उत्पादन करणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हमीभाव केंद्राच्या जाचक अटीमुळे तब्बल २५० कोटी ३२ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

सोयाबीनप्रमाणेच उडीद आणि मूग उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांनाही जाचक अटींमुळे सुमारे ६३ कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. जिल्ह्यात ६० हजार ८३७ हेक्टर क्षेत्रावर उडीद लागवड करण्यात  आली. उडदाचे ३ लाख ४ हजार क्विंटल एकुण उत्पादन झाले. हमीभाव केंद्रावर केवळ ३ हजार १८३ क्विंटल उडीद ५ हजार ४०० रुपये दराने खरेदी करण्यात आला. उर्वरित शेतकर्‍यांना खुल्या बाजारात ४ हजार रुपये देखील भाव मिळू शकला नाही. त्यामुळे उडीद पिकवणार्‍या जिल्हाभरातील शेतकर्‍यांना ४२ कोटी ११ लाख रुपयाचे नुकसान हकनाक सहन करावे लागले. मुगाची ३१ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. १ लाख ३६ हजार क्विंटल उत्पादन शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार शेतकर्‍यांच्या पदरात पडले. मुगाचा हमीभाव ५ हजार ५७५ रुपये ठरविण्यात आला. मात्र, सरकारने फक्त २७६ क्विंटल मूग हमीभावाने खरेदी केला. उर्वरित ३ लाख ३५ हजार ७२४ क्विंटल मूग खुल्या बाजारात विकण्याची वेळ जाचक अटीमुळे शेतकर्‍यांवर येऊन ठेपली. परिणामी एकट्या मूग पिकाचे उत्पन्न घेणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २१ कोटी २७ लाख रुपयावर पाणी सोडावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2017 7:47 pm

Web Title: farmer poor and the merchants are worthless in osmanabad
Next Stories
1 शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दप्तर दिरंगाई भोवली, हिंगोलीचे तहसीलदार निलंबित
2 मुख्यमंत्रीपद हे माझे स्वप्न नाही : उद्धव ठाकरे
3 कोपर्डी प्रकरणातील बचावपक्षाच्या वकिलांना अज्ञातांकडून धमकी
Just Now!
X