“शरद पवार यांच्या जवळ जाण्यासाठी (प्लस मध्ये राहण्यासाठी) ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ हे सतत माझ्यावर टीका करीत असतात. तर गृह राज्यमंत्री मंत्री सतेज पाटील यांनी हवाई राजकारण सोडले, तर भाजपाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी कायद्यासाठी समर्थन मिळवत असल्याचे दिसेल,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचा मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला.

“मी कोठेही काही बोललो की त्यावर टीका करणे हे मुश्रीफ-सतेज पाटील यांचे कामच बनले आहे. त्यांनी माझ्यावर कारण नसताना काल टीका केली. माझ्यावर बोललं की, आपण शरद पवार यांच्या प्लसमध्ये (जवळ) जातो ही भावना मुश्रीफ यांच्याकडे असल्याने ते सतत टीका करीत असतात. सतेज पाटील यांनी भाजपाच्या लोकांनी बांधावर जाऊन कृषी कायद्याचे महत्व सांगावे, लोक त्यांना उत्तर देतील असे विधान केले होते. मात्र सतेज पाटील यांनी हवाई राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या शिवारात पहावे. समरजितसिंह घाटगे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते गेले महिनाभर बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या विधेयकाचे महत्त्व समजावून सांगत आहेत. त्यामुळे हे दोन्ही मंत्री विनाकारण टीका करीत आहेत. राज्याची सांस्कृतिक विचारसरणी यातून खालावत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“शेतकरी आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही”

“देशातील सर्वसामान्य शेतकर्‍यांचा या विधेयकाला पाठिंबा आहे. पंजाब, हरियाणा वगळता इतर ठिकाणी विरोध होत नाही. तसे असते अन्य राज्यातही आंदोलनाचे चित्र दिसले असते. या आंदोलनाचा निवडणुकीवर कसलाही परिणाम होणार नाही. उलट शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडल्याबद्दल शेतकरी नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “बाजार समित्यांचे अस्तित्व पुसले जाणार नाही. मी सहकार मंत्री असताना राज्यातील बाजार समित्यांची मक्तेदारी दूर करणारे निर्णय घेतले होते. तेव्हा पंधरा दिवस बंद पाळण्यात आला होता. मात्र शेतकरी त्यांचा माल आता कुठेही विकू शकतो. करोना काळामध्ये कोकणातील शेतकऱ्यांनी त्यांचा आंबा ऑनलाईन विकला, हे त्याचे उदाहरण आहे. हितसंबंधी लोकच या आंदोलनात आहेत. आपल्या मालाचे नुकसान होऊ नये, दुकानाची नासधूस होऊ नये यासाठी आज बंदला पाठिंबा दिल्याचे दिसते,” असेही ते म्हणाले.