नाशिकमधील धरणांमधून आमच्या हक्काचे पाणी सोडावे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांनी सोमवारी येथील नांदुर मध्यमेश्वर बंधारा परिसरात धडक मारून सुरू केलेले आंदोलन शासनाने खरीप पिकासाठी लगेचच आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्यावर सायंकाळी मागे घेण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील इंडिया बुल्स आणि औरंगाबादेतील मद्याच्या कंपन्यांना पाणी देण्यासाठी नगरमधील शेतीचे पाणी हिरावून घेतले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. आंदोलनामुळे धरण परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाल्यामुळे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गत वर्षीच्या दुष्काळानंतर नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यातील पाणी संघर्ष चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी सोडावे म्हणून नांदुरमध्यमेश्वरला अचानक धडक दिली होती. त्याची पुनरावृत्ती आता गोदावरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली नगरच्या शेतकऱ्यांनी केली. कोपरगाव व राहता परिसरातील शेकडो शेतकरी दुचाकी व इतर वाहनांनी निफाड तालुक्यातील या बंधाऱ्यावर पोहोचले. त्याची कुणकुण लागल्याने पाच दंगा नियंत्रक पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व शेकडो पोलीस कर्मचारी आधीच या भागात तैनात करण्यात आले होते. बंधाऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांना खेडलेझुंगे गावाजवळील चौकात रोखून पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी येथेच आंदोलन सुरू केले. नगरमधील शेतीसाठी ब्रिटीश काळापासून ११ टीएमसी पाणी आरक्षित आहे.
शासन व प्राधिकरणाकडून ते काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्सच्या प्रकल्पाला शासनाने ३ टीएमसी पाणी दिले तर औरंगाबादमधील मद्याच्या कारखान्यांसाठी जायकवाडीला मोठय़ा प्रमाणात दिले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवले जात असून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. या घडामोडी सुरू असतानाच मंत्रालयात रब्बीच्या हंगामासाठी आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी रात्री आठ वाजता हे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिल्यावर आंदोलक माघारी परतण्यास सुरूवात झाल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ व प्रांताधिकारी संध्या नरके यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘गंगापूर’मधून प्रथमच पाण्याचा विसर्ग
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ८० टक्क्यांवर पोहोचल्याने सोमवारी या धरणातून १,००० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. दोन वर्षांनंतर प्रथमच या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने सातत्य राखल्याने परिसरातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होत आहे. दारणामध्ये सोमवारी ५,२१२ दशलक्ष घनफूट (७३ टक्के) साठा असून या धरणातून ३,५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. गंगापूर धरणात ४,५१४ दशलक्ष घनफूट (८० टक्के) साठा झाल्यामुळे त्यातून सोमवारी १,००० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी दिली.