शेतकरी आंदोलनावरून देशभरात घमासान सुरू आहे. आंदोलक शेतकऱ्यांबद्दल पॉपस्टार रिहानासह ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना समर्थन दिलं होतं. त्यावरून देशात बरंच रणकंदन झालं. देशातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनी भारताच्या अखंडतेवर भर दिला. सेलिब्रिटींनी घेतलेल्या भूमिकेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी भडकले आहेत.

रिहानाच्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या भूमिकेनंतर ट्विट केले होते. भारतीय स्वतःचे प्रश्न सोडण्यास सक्षम असून, बाहेरच्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचा सूर सेलिब्रिटींनी लावला होता. सेलिब्रिटींच्या भूमिकेवर राजू शेट्टी यांनी टीका केली.

“सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटींनो शेतकऱ्याला देशद्रोही ठरविताना जरा भान ठेवा. तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने आहेत हे विसरू नका, नाहीतर तुमचं तुणतुणं बंद पडेल!!,” असं राजू शेट्टी म्हणाले.

काय होता मुद्दा?

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल पॉपस्टार रिहानानं ट्विट केलं होतं. आपण याबद्दल का बोलत नाही आहोत? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. त्यानंतर ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांच्यासह अनेकांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं. त्यावर परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट भूमिका मांडतं. प्रश्नांची माहिती करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतात कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंतांनी ट्विट केलं होतं.

राज ठाकरेनींही मांडलं होतं मत?

“सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं आहेत. या लोकांना अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं. ही खूपच मोठी माणसं आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये. हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आलंय. पाकिस्तानमधून आलंय. शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं, पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना… त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्नं आहेत. खूप मोठी माणसं आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं… ती साधी माणसं आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं, त्यांनी ट्विट केलं, पण आज जे ट्रोल होतंय आज त्यांच्यावरच येतंय,” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं होतं.