01 March 2021

News Flash

“चिथावणी देणारे भाजपा परिवारातील निघावेत यासारखा विनोद तो कसला?”

मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की नाही?; संजय राऊतांचा सवाल

संग्रहित छायाचित्र

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या महत्त्वाचा मुद्दा बनलं आहे. दिल्लीचं राजकारण शेतकरी आंदोलनाभोवती फिरत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की नाही?, असा थेट सवाल पंतप्रधान व गृहमंत्र्यांना केला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावर भाष्य केलं आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाही प्रश्न विचारला आहे. “मंगळवार दि. 26-1-2021 रोजी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी सरळ दिल्लीत घुसले व त्यांनी काही काळासाठी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. दिल्लीच्या रस्त्यांवर आणि लाल किल्ल्यावर काही काळासाठी ‘युद्ध’ परिस्थितीच निर्माण झाली. ‘हे धर्मयुद्ध आहे’ असा शेरा यावर कुणीतरी मारला. दिल्लीच्या सीमेवर 60 दिवसांपासून जे शेतकरी जमले आहेत, त्यांना कोणताही धर्म नाही व राजकीय पक्ष नाही. आपली शेती, पुढच्या पिढीचे भविष्य कॉर्पोरेट दलालांच्या हाती जाऊ नये यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकरी हिंसक झाले व त्यांना तशी चिथावणी देण्यात आली. हे चिथावणी देणारे व शेतकऱयांना लाल किल्ल्यात घेऊन जाणारे नेते शेवटी भाजप परिवारातील निघावेत यासारखा विनोद तो कसला?,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

“28 तारखेपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले. राष्ट्रपतींचे अभिभाषण 28 तारखेला मध्यवर्ती सभागृहात झाले. सरकार लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आहे, शेतकऱयांचे ऐकत नाही या मुद्द्यांवर सर्वच विरोधकांनी राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार टाकला. त्यामुळे रटाळ भाषण जास्तच बेचव ठरले. सभागृहात सरकारी पक्षाचे लोक बाके वाजवत राहिले व आपले महामहिम राष्ट्रपती छापील भाषण वाचत राहिले. शेतकऱयांचे नेते राष्ट्रपती भवनात जाऊन कैफियत मांडून आले, पण उपयोग काय? देशाच्या घटनात्मक प्रमुखांना 60 दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा अधिकार नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान गप्प का?

“शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत घुसला व त्याने दंगल केली. राज्यकर्त्या पक्षाच्या प्रेरणेनेच जेव्हा दंगली होतात, तेव्हा अहिंसेवरील प्रवचने उपयोगी पडत नाहीत. शेतकऱ्यांचे आंदोलन कसे राष्ट्रद्रोही आहे यावर भाजपाचा ‘आयटी’ विभाग आता समाज माध्यमांवर प्रवचने झोडत आहे. पण शेवटी पंतप्रधान, गृहमंत्री यांची काही जबाबदारी आहे की नाही? पुन्हा मोदी व शहा हे इतर वेळी राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत राजकीय विरोधकांवर बरसत असतात, पण दिल्लीत 26 जानेवारी रोजी इतका मोठा हिंसाचार झाला, त्यावर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री. मोदी व शहा हे आज प्रमुख घटनात्मक पदांवर बसून देशाचे नेतृत्व करीत आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांशी असे वागणे म्हणजे देशात अशांततेची नवी ठिणगी टाकणे आहे,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 9:33 am

Web Title: farmer protest sanjay raut rokhthok narendra modi amit shah bmh 90
Next Stories
1 आता डोक फोडून घ्यायचं का?; …अन् सभेतच अजित पवार संतापले
2 राज्याचा रिकव्हरी रेट ९५.२३ टक्क्यांवर; २,६३० नव्या करोनाबाधितांची नोंद
3 आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत : मेधा पाटकर
Just Now!
X