शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलन देशभरात पसरताना दिसत आहे. सर्वच राज्यांमध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटत असून, अनेक राजकीय पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तीन कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेनं दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केला आहे.

शिवसेनेनं उद्या पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला खडेबोल सुनावले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “होत असलेलं आंदोलन आणि आंदोलनाला राजकीय पक्षांकडून दिला जाणारा पाठिंबा याबद्दल आश्चर्य वाटत आहे. जे पक्ष निवडणुकीत सातत्यानं पराभूत होत आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपलं राजकारण करायचं आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांच्या भविष्याची चिंता आहे. शेतकऱ्यांचं भविष्य त्यांच्यासाठी गौण आहे,” असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

आणखी वाचा- “आज आरडाओरड करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?”

“या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचं ४८ वर्ष दोन महिने सरकार होतं. देशात ५२ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं सरकार होतं. ज्याला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचो, मग त्या कृषी क्षेत्रात असं काय झालं? का व्याख्या बदलली याचं कधी चिंतन केलं का? आज काही राजकीय पक्ष मी नेत्यांबद्दल बोलत नाही. त्यांना राजकीय विस्मरणाचा आजार झाला. त्याला आपण पॉलिटिकल अल्झायमर हा शब्द वापरू शकतो,” असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर अप्रत्यरित्या निशाणा साधला.

आणखी वाचा- “…तर शेतकरीच भाजपा नेत्यांना पायातील काढून उत्तर देतील,” सतेज पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

पाठिंबा अन् सभात्याग?

केंद्र सरकारनं कृषी विधेयक संसदेत मांडली. त्यावेळी प्रचंड गदारोळ झालेला पाहायला मिळालं. या विधेयकांना शिवसेनेनं लोकसभेत पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत मात्र, भाषणातून विरोध व्यक्त करत सभात्याग केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही या तिन्ही विधेयकांना स्पष्टपणे विरोध दर्शवला नव्हता. शिवसेनेच्या याच भूमिकेवरून मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.