थेंब-थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहतील, अशी परिस्थिती संपूर्ण देशात उद्भवली असून हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांनीच एकजुटीने रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील पोथरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात खासदार शेट्टी हे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, करमाळा तालुकाध्यक्ष महेश चिवटे, सचिव विवेक येवले, सुभाष सावंत, महादेव चौधरी आदी उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले, की राजकारण गलिच्छ आहे असे समजून तरुणांनी राजकारणापासून दूर राहू नये, तर राजकारणातील घाणेरडे, भ्रष्ट व खलप्रवृत्तीचे राजकारणी आता खडय़ासारखे बाजूला काढण्याची जबाबदारी तरुण वर्गावर आली आहे. सिंचनाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सत्ताधारी पुढाऱ्यांनी ७२ हजार कोटी गिळंकृत केले आहेत. तरीसुध्दा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. भ्रष्टाचाराच्या पशातून सत्ता व सत्तेतून पशा हे सूत्र अवलंबविणा-याआघाडी सरकारला खाली खेचून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ देण्याची शपथ या वेळी खासदार शेट्टी यांनी उपस्थित शेतक-यांना दिली.
या वेळी बोलताना सदाशिव खोत यांनी कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यास मिळण्यासाठी येत्या २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी सुजित बागल यांनी करमाळा तालुक्यातील रायगाव गटातून प्रकाश पाटील व सुजित बागल यांची किंमत सत्ताधारी बागलांना चुकवावीच लागेल. जोपर्यंत कुकडीचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला. या प्रसंगी महेश चिवटे, विवेक येवले, सुभाष सावंत , प्रकाश झिंजाडे-पाटील आदींनी आमदार बागल कुटुंबीयांवर कडवट टीका केली. मेळाव्याला प्रारंभ होताच विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडू लागला. भर पावसात सुमारे तीन तास मेळावा सुरू होता.