श्रीगोंदे तालुक्यात शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील तरुण कष्ट करत शिकला व स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर रसायन अभियंता (बीई) झाला व आता त्याची अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेत कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. महेश जांभळे असे या तरुणाचे नाव. हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयाचा तो माजी विद्यार्थी. त्याच्या कामगिरीबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच त्याचा गौरव केला.

महेश मूळचा काष्टीजवळील गजाननवाडीचा. तेथेच त्याचे आई-वडील मजुरी करतात. सन २००१ ते २००७ दरम्यान महेशचे शालेय आणि दहावीपर्यंतचे शिक्षण दादा चौधरी विद्यालयात झाले. नंतर तो श्रीगोंद्याच्या महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेजमध्ये १२वी शास्त्र उत्तीर्ण झाला. तो पुण्यातील महाविद्यालयामधून रसायन अभियंता झाला. तिसऱ्या वर्षांचे शुल्क न भरता आल्याने महेशला एक वर्ष घरीच बसावे लागले. या काळात त्याने शेतात तसेच वायरमन म्हणून काम केले.

गेल्या वर्षी कॉलेज सुरू असतानाच त्याने नासाने इस्रोमार्फत घेतलेल्या अखिल भारतीय परीक्षेत महेश देशात ११वा व महाराष्ट्रात प्रथम आला. नंतर नासाने त्याला एक महिना प्रशिक्षण दिले. त्याची नासामध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. लवकरच तो दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यानंतर नासात रुजू होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रीजलाल सारडा, मानद सचिव सुनील रामदासी यांनी त्याचा सत्कार केला.

दादा चौधरी शाळेत शिक्षण घेतल्याचा आपल्या मनात अभिमानच आहे.

वडिलांनी कर्ज काढून व व्याजाने पैसे घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. घरच्या या परिस्थितीची जाणीव ठेवून पुढील काळात आपण गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे सांगताना त्याने सत्कारामुळे आपण भारावून गेल्याचे मनोगत व्यक्त केले.