ऊस पीक पाण्याअभावी जळू लागल्याने व शेतातील बोअर कोरडे पडल्याने नैराश्यापोटी शेतकऱ्याने ऊसाच्या शेतातच विष प्राशन करुन आपली आत्महत्या केल्याची घटना ढवळस (ता. माढा, जि. सोलापूर) येथे घडली. मधुकर कर्ण ढवळे (वय ४७) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ढवळे यांना दोन एकर जमीन आहे. यापैकी त्यांनी यावर्षी दिड एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली होती. ढवळे यांनी शेतात घेतलेले बोअरही कोरडे पडले होते. त्यांनी बोअरमधील जुनी नादूरूस्त विद्युत मोटर काढून नवीन मोटार खरेदी केली होती. मात्र ती बोअरमध्येच अडकली होती. दुसरी मोटर टाकली, ती सुध्दा बोअरमध्ये अडकली. दोन्ही मोटर बोअरमध्येच अडकल्या. त्यातच उसाला पाणी न मिळाल्याने ऊस जळून जाऊ लागल्याने व आर्थिक चणचणीमुळे ढवळे हे मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यापोटी त्यांनी सोमवारी रात्री उशिरा स्वत:च्या ऊसाच्या शेतात विष प्राशन केले. त्यांना गंभीर अवस्थेत बार्शी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ढवळे यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ढवळे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.