कर्जाचा डोंगर, मुलींच्या विवाहाची चिंता आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेली शेती यामुळे व्यथित झालेल्या सुधाकर महादेव पाटेकर (४५) या शेतकऱ्याने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे घडली. संतप्त नातेवाईकांनी मदतीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला.

सुधाकर याने बुधवारी दुपारी शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. अत्यवस्थ स्थितीत त्याला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्येची माहिती कळताच अनेक गावकरी शवविच्छेदन गृहाबाहेर जमले होते. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सुधाकरचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नेला. प्रशासनाने त्याच्या कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गावकरी मृतदेह घेऊन नांदगाव खंडेश्वरकडे रवाना झाले.

सुधाकर पाटेकर हा अल्पभूधारक शेतकरी होता. त्याच्याकडे असलेल्या तीन एकर शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. एका महिन्याआधी वडिलांचे निधन झाले, तर पंधरा दिवसांपूर्वी आईचाही मृत्यू झाला. दोघांच्या आजारावरील उपचारासाठी मोठा खर्च झाला होता. सुधाकरला कर्ज घ्यावे लागले होते. याआधी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर मोठा होता. त्यातच या आकस्मिक गरजांसाठी घेतलेल्या कर्जाची भर पडत गेली. सुधाकरला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा लहान आहे. मुलींचे विवाह, शिक्षणाचा खर्च याची चिंता त्याला भेडसावत होती. यंदा शेतीतून उत्पन्न हाती येईल, अशी आशा त्याला होती, पण अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे नैराश्यातून सुधाकरने आत्महत्येचा मार्ग निवडला, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.