नगर तालुक्यात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पिण्याच्या पाण्याचा टँकर व जनावरांची छावणी बंद केल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. लक्ष्मण संपत गाडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. खांडके गावातील लक्ष्मण संपत गाडे यांनी गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. टँकर व छावणी बंद केल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नगर तालुक्यातील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे.

या घटनेचा निषेध करत संतप्त शेतकऱ्यांकून पाथर्डी रस्त्यावरील कवडगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या नगर तालुक्यातील दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी केला आहे.

नगर तालुक्यात अद्यापही दुष्काळ आहे. मात्र अशा परिस्थितीतही चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. यामुळेच लक्ष्मण संपत गाडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लक्ष्मण गाडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यात असणारआहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.