News Flash

धुळ्यातल्या दरखेडा गावात विष पिऊन शेतकऱ्याने आयुष्य संपवलं

रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच शेतकऱ्याचा मृत्यू

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. आजही धुळे  जिल्ह्यातल्या दरखेडा गावात असाच प्रकार घडला. दगडू अनंता पवार या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपविले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत होते. मात्र त्याचवेळी त्यांनी प्राण सोडले.
यावर्षी चांगला पाऊस येईल, चांगले पीक येईल अशी आशा दगडू पवार यांना होती. याच आशेवर आपल्याचा चार पैसे बरे मिळतील असे वाटून त्यांनी पुन्हा एकदा विविध कार्यकारी सोसायटी आणि नातलग यांच्याकडून दीड ते दोन लाख रूपये कर्ज म्हणून घेतले. शेतीची मशागत करुन पेरणीही केली. मात्र पावसामुळे दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवले. दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे? कुटुंबाला खाऊ काय घालायचे?, कर्ज कसे फेडायचे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने अखेर दगडू पवार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
घराच्या गच्चीवर जाऊन त्यांनी विषारी औषध प्यायले. त्यांच्या कुटुंबाला हा प्रकार समजला. त्यानंतर तातडीने त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच दगडू पवार यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असे कुटुंब आहे.  शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र सरकार काय किंवा प्रशासन काय कोणालाही या आत्महत्यांना काहीही घेणेदेणे नाही असे चित्र सध्या राज्यात आहे.
दगडू पवार यांच्याप्रमाणेच रोज शेतकरी आत्महत्या होण्याच्या बातम्या येत आहेत. आपल्यानंतर निदान आपल्या कुटुंबाला तरी काहीतरी भरपाई मिळेल किंवा आपले कर्ज माफ होईल, आपले कुटुंब जाचातून मुक्त होईल असे वाटल्याने शेतकरी मृत्यू जवळ करतो. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याच्या गप्पा मारल्या जातात. आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात त्याचे आयुष्य मात्र भीषण आहे. रोज जगायचे कसे? आपल्या कुटुंबाला पोसायचे कसे? घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्याजवळ नसतात, म्हणून तो मृत्यू जवळ करतो.
अशा किती आत्महत्या झाल्यावर सरकार किंवा प्रशासन यांना जाग येणार आहे? याचे उत्तर आत्तातरी अनुत्तरीत आहे. मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा धीराने प्रसंगाला तोंड देणे गरजेचे आहे. मृत्यूला कवटाळून कुटुंबाचे हाल का करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांनी किमान एकदा तरी स्वतःला विचारायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2017 9:23 pm

Web Title: farmer suicide in dhule district
Next Stories
1 कोपर्डी बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साक्षीदार ?
2 मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवारांमध्ये ‘कर्जमाफी पे चर्चा’
3 मुख्यमंत्री-गडकरींसाठी राणे ‘स्वागतोत्सुक’
Just Now!
X