News Flash

‘बळी’राजा… करोना काळावधीत विदर्भात दर महिन्याला १११ शेतकऱ्यांची आत्महत्या

आत्महत्यांच्या चौकशीत आर्थिक कारण असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासन १ लाख रुपये मदत करते पण एकूण आत्महत्यांपैकी ६७.१५ टक्के प्रकरणांची चौकशी प्रलंबित

farmer suicide in maharashtra
जानेवारी २०२१ ते मे २०२१ या करोनाच्या दुसऱ्या लाटेतील कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांत ३४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

एकीकडे संपूर्ण देश करोनाच्या साथीविरुद्ध लढत असतानाच महाराष्ट्रामधील विदर्भातील शेतकरी एका वेगळ्याच साथीला तोंड देत होते. ही साथ होती वाईट आर्थिक परिस्थितीची नागपूर आणि अमरावती या विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये मागील १६ महिन्यांमध्ये एकूण १७८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच महिन्याला १११ शेतकऱ्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलंय. यापैकी सर्वाधिक मृत्यू अमरावती जिल्ह्यात झालेत. जानेवारी २०२१ ते मे २०२१ या करोनाच्या दुसऱ्या लाटेतील कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांत ३४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे करोनाने बळीराजाचाच बळी घेतल्याचं गंभीर चित्र सध्या विदर्भामध्ये दिसत आहे.

सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागामधील यवतमाळमध्ये झाल्यात. २०२० साली जिल्ह्यामध्ये एकूण ३१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर २०२१ मध्ये पहिल्या चार महिन्यात ८३ तर मे महिन्यामध्ये आणखीन २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने यवतमाळमध्ये पहिल्या पाच महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १०३ वर पोहचलीय. याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ साली १६ फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या प्रचार सभा घेतली होती. त्या निवडणुकीमध्येही या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा होता.

नक्की वाचा >> पंतप्रधान मोदी म्हणाले, “शेतकरी स्वत:चं भलं करु शकले असते तर…”

नागपूर विभागामध्ये मागील १६ महिन्यांमध्ये ३८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. येथील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. येथे मागील वर्षी १५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर या वर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान ४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांच्या समावेश होतो. अमरावती विभागीय आयुक्तांकडून द क्विंटला मिळालेल्या माहितीनुसार पाच जिल्ह्यांमध्ये १४०० शेतकऱ्यांनी मागील १६ महिन्यांमध्ये आत्महत्या केलीय. म्हणजेच नागपूरशी तुलना केल्यास अमरावतीमध्ये शेतकरी आत्महत्येचा प्रश्न अधिक गंभीर आहे.

मदतीला अपात्र…

दरम्यान आत्महत्यांच्या चौकशीत आर्थिक कारण असलेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरवत त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये शासन मदत करते. परंतु ३१ मे २०२१ पर्यंत येथील एकूण आत्महत्यांपैकी ६७.१५ टक्के प्रकरणांची (२२९ प्रकरणे) चौकशी प्रलंबित असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.

नक्की वाचा >> फडणवीस यांना ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’ उपाधी दिल्याने पडळकर ट्रोल; पडला कमेंट्स अन् प्रश्नांचा पाऊस

अमरावती विभागातील सर्वाधिक १०३ आत्महत्या यवतमाळ जिल्ह्य़ातील आहेत. येथे ६३ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांतील १५ प्रकरणे पात्र, २५ प्रकरणे अपात्र असून १५ पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत केली. बुलढाणा जिल्ह्य़ात ९७ आत्महत्या झाल्या. त्यातील ८२ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांत २ प्रकरणे पात्र तर १३ प्रकरणे अपात्र आहे. येथे २ पात्र कुटुंबीयांना आर्थिक मदत केली गेली. अमरावतीत ७३ आत्महत्या झाल्या. त्यातील ४८ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर २१ आत्महत्या पात्र तर ४ अपात्र असून २१ पात्र कुटुंबीयांना मदत दिली गेली. अकोल्यात ४८ आत्महत्या झाल्या. त्यातील ३२ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांतील १४ पात्र तर २ अपात्र असून १४  पात्र कुटुंबीयांना मदत दिली गेली. वाशीममध्ये २० आत्महत्या झाल्या. त्यातील ४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांत १ पात्र तर १५ अपात्र ठरले. एक पात्र कुटुंबाला मदत दिल्याचेही माहितीच्या अधिकारातून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे प्रशांत देशमुख यांनी अभय कोलारकर यांना कळवले आहे.

वर्ष २०२० मध्येही १,१३६ आत्महत्या

राज्यात करोनाची पहिली लाट मार्च २०२० पासून सुरू झाली होती. दरम्यान, अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांत २०२० या वर्षांत १ हजार १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चौकशीत पैकी ५०२ प्रकरण पात्र, ५४५ प्रकरणे अपात्र ठरले.

नक्की वाचा >> अन्नासाठी आपण शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून आहोत, म्हणणाऱ्याला Swiggy चं भन्नाट उत्तर

अमरावती विभागातील वर्षनिहाय शेतकरी आत्महत्येची स्थिती

जिल्हा                २०१७         २०१८         २०१९            २०२०

अमरावती           २७३            २३८            २६९               २९५

अकोला              १६७            १४२            १२४               १५९

यवतमाळ           २४२             २५५           २८८               ३१९

बुलढाणा             ३१२             ३१६            २८१               २७०

वाशीम               ७२               ९८               ९२                  ९३

एकूण               १०६६              १०४९        १०५४             ११३६

अमरावती विभागातील ८९ प्रकरणांची चौकशी अद्यापही प्रलंबित असून ५०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 1:40 pm

Web Title: farmer suicide in maharashtra during 16 month of corona period 111 farmers died every month scsg 91
Next Stories
1 पुण्यात उदयनराजे आणि संभाजीराजेंची भेट; मराठा आरक्षणावर दोन्ही राजेंमध्ये चर्चा
2 …तर निर्बंध अजून कठोर करणार; अजित पवारांचा कोल्हापूरकरांना इशारा
3 “मोहन भागवतांनी खुलासा करावा,” राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावरुन संजय राऊतांचा संताप
Just Now!
X