अतिवृष्टी, अवर्षण, गारपीट या दुष्टचक्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. कोंड येथील तरुण शेतकरी जयवंत भोसले यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री लोहारा तालुक्यातील लोहारा बुद्रुक येथील शेतकरी मनोहर येल्लुरे (वय ५६) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पेटवून घेतले. या घटनेत येल्लुरे ९० टक्के भाजले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. मागील ११ महिन्यांत जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली.
लोहारा ब्रुद्रुक येथील शेतकरी मनोहर लक्ष्मण येल्लुरे यांना १२ एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी, दोन मुले व मुलगी असे कुटुंब असलेले येल्लुरे मागील १५ दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे भांबावून गेले होते. गावातील सेवा संस्थेचे कर्ज, दुष्काळामुळे शेतातून मिळणारे उत्पन्न शून्य यामुळे चिंताक्रांत असलेल्या येल्लुरे यांना कुटुंबाच्या हातातोंडाचा मेळ घालणे जिकिरीचे ठरत होते.
त्यांचा एक मुलगा लातूर येथे मजुरी करतो, तर दुसरा अनिल त्यांना शेतीमध्ये मदत करीत असे. संस्थेच्या कर्जाशिवाय बचत गटाच्या नावाखाली २६ टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करणाऱ्या खासगी मायक्रो फायनान्सच्या हप्त्यानेही येल्लुरे पुरते अडचणीत आले होते. बचत गटाचे हप्ते भरण्यासाठी दर आठवडय़ाला खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेला तगादा, दुष्काळामुळे शेतातून न मिळालेले उत्पन्न यामुळे येल्लुरे पंधरवडय़ापासून तणावाखाली होते. हप्त्याच्या धास्तीमुळे मंगळवारी रात्री राहत्या घरी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ते ९० टक्के भाजले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
‘जगण्यात राम नाही, कष्टाला मोल नाही’
जगण्यात काही राम नाही. कष्टाला अजिबात मोल नाही, असे काहीबाही येल्लुरे बोलत. मागील आठ दिवसांत दोन वेळा त्यांनी आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. आम्ही समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु घरात कोणी नसताना अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्याचे पसे आहेत, त्याचा दमडाही आम्ही ठेवणार नाही. परंतु देवाने त्यांचे प्राण वाचवावेत, अशी प्रार्थना त्यांची पत्नी भारतीबाई रडवेल्या डोळ्यांनी करीत आहेत. त्यांच्यासोबत शेती करणारा मुलगा अनिलही कर्जबाजारीपणा व नापिकीमुळेच वडिलांनी हा मार्ग पत्करल्याचे सांगतो. लोहारा पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या प्राथमिक जबाबातही शेतकरी येल्लुरे यांनी सोसायटीचे कर्ज व बचत गटाच्या हप्त्यामुळे पेटवून घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, रविवारी रात्री उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील तरुण शेतकरी जयवंत (बाबासाहेब) महादेव भोसले (वय २८) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून जीवनयात्रा संपविली. शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या भोसले यांचे आई-वडील अंध आहेत. त्यांना पाच वर्षांचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आहे. अंध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकली अक्षरश उघडय़ावर आले आहेत. अडीच एकर जमीन असणाऱ्या जयवंतला नापिकीमुळे जबर फटका बसला. अशा अवस्थेत बँक व खासगी कर्जाच्या वसुलीचा तगादा त्याला आत्महत्या करण्याकडे खेचून घेऊन गेल्याची प्रतिक्रिया त्याच्या अंध आई-वडिलांनी हंबरडा फोडून व्यक्त केली.
वेळी अवेळी पडणारा पाऊस, सततचा दुष्काळ, मागील वर्षी झालेली गारपीट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. मागील ११ महिन्यांत आतापर्यंत ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. बहुतेक आत्महत्येचे कारण नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणा असल्याचे स्पष्ट होत आहे. आत्महत्याग्रस्तांपकी १२ शेतकऱ्यांचे कुटुंबीय अर्थसाह्य़ घेण्यास पात्र, तर २५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविल्या. पाच प्रकरणे निर्णयासाठी राखून ठेवण्यात आली, तर ६ आत्महत्यांची नोंद अजून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सेनगावमधील विष घेतलेल्या दोघा शेतकऱ्यांचा अखेर मृत्यू
वार्ताहर, हिंगोली
नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या नराश्येतून सेनगाव तालुक्यातील धोत्रा येथील रामभाऊ भगवान ढोणे व दाताडा (खु.) येथील कानबा जयाजी सरगड या शेतकऱ्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सेनगाव पोलिसांत या बाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
धोत्रा येथील रामभाऊ ढोणे (वय ४५) यांना ६ एकर जमीन असून, शेतात ज्वारी, सोयाबीन पिकांची पेरणी केली. परंतु पाऊस कमी झाल्याने पीक हातून गेले. शेतात केवळ ४ पोती सोयाबीन झाले. नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ढोणे होते. ढोणे यांनी दोन वर्षांपूर्वी स्टेट बँकेकडून शेती गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले होते. व्याजासह हे कर्ज ५ लाखावर गेले. त्यांची मुले संतोष व माधव यांच्या नावेही प्रत्येकी १ लाख रुपये पीककर्ज होते. नापिकीमुळे निराश रामभाऊने २७ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता घरातील मंडळी शेतात गेल्यानंतर विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून धावून आलेल्या शेजारच्या लोकांनी शेतावर गेलेल्या मुलांना कळविले व रामभाऊला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रामभाऊ दोन दिवस बेशुद्धावस्थेत होते. मात्र, शुद्धीवर आल्यानंतर पाचव्या दिवशी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला.
सेनगाव तालुक्यातील दाताडा (खु.) येथील कानबा जयाजी सरगड (वय ४२) यांना ७ एकर जमीन असून, त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु कमी पावसामुळे पीक हातून गेले. या वर्षी मुलीच्या विवाहाचा बेत केला होता. गुरुवारी त्यांच्याकडे मुलीला पाहण्यास पाहुणे येणार होते. मात्र, शेतात नापिकीमुळे व स्टेट बँकेचे दीड लाखाचे कर्ज अंगावर असल्याने मुलीचे लग्न कसे करावे, या विवंचनेत सरगड सोमवारी घराबाहेर पडले. ते घरी परतले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता बुधवारी सकाळी तुळशीराम िशदे यांच्या शेतात सरगड यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मुलगा गणपत सरगड यांनी सेनगाव पोलिसांत दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
गेवराईत शेतकऱ्याने पेटवून घेतले
वार्ताहर, बीड
गारापिटीत पंचनामा झाला, पण मदत मिळाली नाही. पावसाअभावी साडेचार एकर क्षेत्रातील कापसाचे पीक करपून गेले. ज्वारी काळी पडल्याने जनावरांना टाकावी लागली. त्यामुळे कुटुंब जगवायचे कसे? कर्ज फेडायचे कोठून? या विवंचनेत शेतकरी सुंदरखिरा राठोड (वय ४०, काठेवाडातांडा, तालुका गेवराई) यांनी मध्यरात्री स्वत:स पेटवून घेतले. जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले असून, त्यांची मृत्यूशी झुंज चालू आहे.
सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळामुळे जिल्ह्य़ातील शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन थेट आत्महत्येचाच मार्ग पत्करत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. याच वेळी सरकारच्या पातळीवर घोषणांचाही दुष्काळच असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. वडवणी तालुक्यातील िपपरखेड येथील शेतकरी भगवान गिन्यानदेव निपटे (वय ४०) यांनी मंगळवारी कापसाच्या शेतातच विष घेऊन जीवन संपविले. कापसाला भाव नाही, कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत हा शेतकरी होता.
दुसऱ्याच दिवशी गेवराई तालुक्यातील काठेवाडातांडा येथील शेतकरी सुंदर राठोड यांनी जाळून घेतल्याची घटना उघड झाली. राठोड यांची ७ एकर शेती आहे. साडेचार एकर क्षेत्रातील कापूस पावसाअभावी करपून गेला. ज्वारी काळी झाली. सहा पोती ज्वारी गुरांनाच चारा म्हणून घालावी लागली. इंडिया बँकेने ४० हजारांच्या कर्जवसुलीसाठी जप्तीची नोटीस बजावली होती. खत बियाणे दुकानदारांची उधारी व ग्रामीण बँक व सोसाटीचेही कर्ज होते. त्यांना पत्नी, दोन मुली व दोन मुले आहेत.