लोकसत्ता प्रतिनिधी
चंद्रपूर:राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तरुण शेतकरी गजानन गोपाळ कष्टी याने शेतीवरील कर्ज माफ न झाल्याने आणि बँकेने कर्ज देणे नाकारल्याने तसेच नवीन शेत लागवडी साठी रक्कमेची जुळवाजुळव करण्यास असमर्थ ठरल्याने गावातील गुरांच्या गोठ्यात विष प्राशन करून आत्महत्या केली.

आज १८ जून, रोजी दुपारी चार वाजता ही घटना घडली. आठ दिवसापूर्वी चुनाळा शेजारच्या चनाखा या गावात एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले होते. चुनाळा येथील शेतकरी गजानन गोपाळ कष्टी ( वय ३७) याचेकडे चार एकर शेती आहे. त्याचेवर चुनाळा सेवा सहकारी संस्थेचे अंशी हजार रुपये कर्ज आहे. कर्ज माफीत हे कर्ज माफ होईल, असे त्याला सांगण्यात आले. मात्र अनेक याद्या येऊनही त्याचे नाव आले नाही. मग त्याने सोसायटी व बँकेकडून कर्जाची मागणी केली, परंतु त्याला कर्ज मिळाले नाही. यामुळे शेती लागवडीची वेळ निघून जात असल्याने हा शेतकरी गेल्या दोन दिवसापासून अवस्थ होता.अखेर पत्नी शेतात गेल्याचे निमित्त साधून गजानन घराजवळील मनोहर पोटे यांच्या गोठ्यात गेला आणि विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.