17 December 2017

News Flash

शरद पवारांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र

दुष्काळामुळे शेतीवर ओढवलेले संकट, त्यातच डोक्यावरील वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे आयुष्याला वैतागून सोलापूर जिल्हय़ात

प्रतिनिधी, सोलापूर | Updated: February 2, 2013 3:30 AM

दुष्काळामुळे शेतीवर ओढवलेले संकट, त्यातच डोक्यावरील वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे आयुष्याला वैतागून सोलापूर जिल्हय़ात आणखी दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव व माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथे हा प्रकार घडला. जिल्हय़ात दुष्काळाची परिस्थिती भीषण होत असताना आतापर्यंत दुष्काळ व पाणीटंचाईमुळे चार शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघात दुष्काळाची स्थिती वरचेवर गंभीर बनत असून त्यातच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे.
उघडेवाडी येथे शिवलिंग लक्ष्मण काटे (वय ६६) या वयोवृद्ध अल्पभूधारक शेतकऱ्याने दुष्काळात संसाराचा गाडा हाकणे शक्य होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन गावातील स्मशानभूमीत चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत शिवलिंग काटे हे अल्पभूधारक होते. त्यांची दीड एकर शेती बचेरी गावच्या शिवारात होती. त्यांच्यावरच संसाराचा गाडा अवलंबून होता. अल्प शेती असल्याने त्यावर विसंबून न राहता काटे हे अन्य शेतकऱ्यांच्या शेतात मजुरीची कामे करीत असत. दुष्काळात शेतमजुरीही मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्यासमोर संसाराचा गाडा कसा हाकायचा, याचा यक्षप्रश्न सतावत होता. त्यातूनच नैराश्य येऊन त्यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यामुळे त्यांचा संसार उघडय़ावर पडला आहे. नातेपुते पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा दुसरा प्रकार पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे घडला. एरवी द्राक्षे व डाळिंबाच्या उत्पादनासाठी सुपरिचित असलेल्या गादेगावातही दुष्काळाने शेतकऱ्यांसह संपूर्ण ग्रामीण जीवनमान जेरीस आणले आहे. या गावातील तरुण शेतकरी प्रशांत अंकुश बागल (वय २५) याने नापिकी व कर्जाचा वाढलेला बोजा यामुळे जीवन जगायचे कसे, या विवंचनेतून आत्महत्या केली. त्याने विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. त्याच्याकडे केवळ तीन एकर शेती असून यंदा दुष्काळामुळे शेतात पीक हाती लागले नव्हते. खरीप वाया गेल्यानंतर आशा न सोडता त्याने रब्बी हंगामात कडवळ व मका लागवड केला होता.
दुष्काळाची परिस्थिती विचारात घेऊन त्याने अलीकडे शेतातील विहिरीचे काम करून घेतले होते. पाण्यासाठी पाइपलाइनही टाकली होती. परंतु दुष्काळात खरिपाप्रमाणेच रब्बीनेही साथ दिली नाही. यात त्याच्या डोक्यावर तीन लाखांचे कर्ज झाले. हे कर्ज परत फेडणे शक्य होत नव्हते. यातच लहान मुलाच्या आजारपणाच्या खर्चामुळे प्रशांत बागल हा पूर्णत: निराश झाला. त्यातूनच त्याने आत्महत्या करून मरणाचा मार्ग पत्करला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, आजी असा परिवार आहे. या अगोदर माळशिरस तालुक्यातील बोंडले येथे पंढरीनाथ दशरथ जाधव व माढा तालुक्यातील एका शेतकऱ्याने दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणे शक्य नसल्याने आत्महत्या केली होती.
शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली माढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील गावे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघात येतात. या भागातील दुष्काळाची परिस्थिती वरचेवर गंभीर बनत चालली असताना त्यावर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणणे अपेक्षित होते. विशेषत: केंद्रीय कृषीमंत्री पवार यांना वर्षांनुवर्षे साथ देणाऱ्या या दुष्काळी भागाचे भाग्य उजळण्याच्या दृष्टीने माढय़ाचे खासदार या नात्याने पवार यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु गेल्या तीन-साडेतीन वर्षांत मतदारसंघाच्या हातात काहीही लागले नाही. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांनी चार-पाच वेळा आढावा बैठका घेतल्या. मात्र त्याची फलनिष्पत्ती काय, असा प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित होत आहे. दुष्काळाच्या निवारणासाठी जो काही निधी प्राप्त झाला, त्यातून ‘टँकरमाफिया’ व ‘चारामाफिया’ तयार झाल्याची चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.

First Published on February 2, 2013 3:30 am

Web Title: farmer suicide session continue in sharad pawar constituency