मराठवाडय़ातील कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या आत्महत्यांचे लोण सोलापूर जिल्हय़ात मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या बार्शी तालुक्यात पोहोचले असून, गेल्या आठवडाभर दोन कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
गेल्या आठवडय़ात नारी येथील एका शेतक-याने शेतातील नापिकी व कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर देवगाव येथे एका शेतक-याने आत्महत्या करून स्वत:चा शेवट केला. उद्धव सिकंदर पाटील असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मृत उद्धव यांचे वडील सिकंदर विश्वनाथ पाटील यांच्या मालकीची दोन हेक्टर ५२ आर शेतजमीन आहे. त्यांच्यावर गावातील कार्यकारी सोसायटीचे एक लाखाच्या कर्जाचा डोंगर होता. संकरित गायी घेण्यासाठी त्यांनी ५० हजारांची उधारी केली होती. परंतु दुधाचे दर कोसळले आणि त्यातच ४० हजार रुपये किमतीच्या एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे पाटील कुटुंबीय अडचणीत सापडले. त्यातूनच वैफल्यग्रस्त होऊन उद्धव पाटील यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशी पथकासमोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे.