शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील एक सर्वात मोठे कारण म्हणजे पावसाप्रमाणेच बाजारातील अनिश्चितता. त्या झोक्यावर शेतकऱ्याचे जगणे टांगलेले असते. त्याचे बाजाराकडून फार मागणे नसते. मातीत जेवढे पैसे पेरले तेवढे उगवून वर थोडीशी मिळकत व्हावी एवढीच त्याची माफक अपेक्षा असते. पण ती पूर्ण होईल याची हमी कोण देणार? खरा प्रश्न आहे तो हाच. शेतीमालाच्या हमीभावाचा. शेतकरी आत्महत्यांचा कलंक मिटवायचा असेल तर हा मुद्दाही ऐरणीवर घ्यावाच लागेल..

ही कहाणी एका चक्रधराची आहे. चक्रधर हनुमंत वाघमारे याची. एका तरुण शेतकऱ्याची. दहा वर्षे, आठ महिन्यांपूर्वी, म्हणजे २२ एप्रिल २००७ रोजी त्याने आत्महत्या केली. जाताना वहीतल्या एका पानावर चिठ्ठीही लिहून ठेवली त्याने. ती नुसती मरणापूर्वीच्या निरवानिरवीची चिठ्ठी नव्हती. ते शेतीसमस्येवरचे भाष्य होते. त्या चिठ्ठीतून त्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

चटका लावणारी ही घटना. तिचा वापर पुढे राजकारणासाठी झाला. विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चक्रधरचे छायाचित्र दाखवून काँग्रेस व राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला चढविला..

त्यातून झाले काय?

चक्रधर गेला. त्याने लिहिलेली चिठ्ठी सतत आपल्या जवळ बाळगणारे त्याचे वडील हनुमंत वाघमारे यांची परिस्थिती आज कशी आहे?  ते पाहिले की शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाच्या एका कंगोऱ्यापर्यंत आपण येऊन पोहोचू शकतो.

हनुमंत वाघमारे यांच्या नावे २५ एकर जमीन आहे. त्यातील २० एकर आज पडीक पडली आहे. त्यांच्या डोक्यावर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यांना तीन मुले. चक्रधर गेला. एक मुलगी उजवून दिली आहे. दुसरा मुलगा पुन्हा शेतीत राबतो आहे. शेती पिकेल का, पिकली तर विकले जाईल का, त्याला नीट भाव मिळेल का, या प्रश्नांची उत्तरे त्यांना माहीत नाहीत. चक्रधर गेल्यापासून तीन दुष्काळांशी दोन हात केलेत त्यांनी.

शेती असूनही ती सगळी कसता येत नाही. जगण्यासाठी शेतातली माती विकण्याची वेळ आली. तरीही शेतीतले कष्ट चुकलेले नाहीत. ते सांगतात, ‘जगायचं असेल तर राबावं तर लागेल. प्रश्न एवढाच आहे की समजा पिकवलं, तर ते विकलं जाईल का?’

वाघमारे हे तसे बागायती शेतकरी. चक्रधर गेला त्या वर्षी त्यांनी ऊस लावला होता. पण त्या साली ४५ लाख टन ऊस अतिरिक्त झाला. तेव्हा साखरेचा दर होता १३०२ रुपये प्रतिक्विंटल आणि उसाचा दर होता १०७५.३५ पैसे. पीक अतिरिक्त झाल्याने अनेकांचा ऊस गाळपाविना वावरातच पडून राहिला.

वाळून पाचटात जमा झाला. अशा शेतकऱ्यांना मग सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत केली. पण ती वाघमारेंसारख्यांच्या घरापर्यंत येण्यास उशीर झाला होता. तोपर्यंत चक्रधरचा मृत्यू झाला होता.

पुढे उसाचे पीक वाढत गेले तसे कारखानेही वाढत गेले. आता एवढे कारखाने झाले आहेत की, कोणाच्याही रानात गाळपाविना ऊस शिल्लक राहणार नाही.

मराठवाडय़ातील सहकारी कारखाने खासगी साखर कारखानदारांनी विकत घतले. आता राज्यात नोंदणीकृत २०२ साखर कारखान्यांपैकी या वर्षी १४७ कारखाने सध्या सुरू आहेत. त्याला ३००४ रुपये प्रतिटन असा भाव द्यावा, असे जाहीर झाले आहे. पण पुरेसा पाऊस झाला तरी बेणे नसल्याने भाव तेजीत आहेत.

हनुमंत वाघमारेंनी मात्र चक्रधर गेल्यानंतर ऊस लावणे कमी केले. तसेही हे पीक पाणी खाणारे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. आता त्यांची बहुतांश जमीन पडीक आहे. जवळच्या मध्यम प्रकल्पात यंदा पाणी आले, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा एकरभर ऊस लावला. दोन लाखांचे पीक कर्ज आणि नातेवाईकांकडून घेतलेले उसने पैसे फेडण्याची विवंचना कायम आहेच. तेव्हा त्यांनी सोयाबीनवर लक्ष्य केंद्रित केले आहे. एक बागायतदार शेतकरी आता कोरडवाहू बनला आहे. या वर्षी पुन्हा पाणी आले आहे. थोडय़ा आशा पल्लवित झाल्या आहेत..

चक्रधरची आत्महत्या तेव्हा शिवसेनेने मोठा विषय बनविला. त्याचा गळफास घेतलेला फोटो स्वत: उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दाखवायचे. तो गेला त्या वर्षी त्याच्या घरी नेत्यांची रीघ लागली होती. अशी मदत मिळवून देऊ, तसे शेत सुधारू असे अनेकांनी सांगितले होते. पण वाघमारेंना पुढे कोणी मदत केली नाही. घरातल्या गायी विकल्या. शेतीचा मोठा हिस्सा पडीक ठेवावा लागला. आजही ते पिकवतात. पण प्रश्न तोच आहे, पिकले तर विकले जाईल का? त्याला भाव येईल का?

untitled-11