राठोड, पत्नी व मुलीच्या नावे तीन चिठ्ठय़ा
पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेर या मतदारसंघातील मारवाडिया गावातील शेतकरी विशाल नामदेव पवार याने नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आपल्याच शेतातील विहिरीत शुक्रवारी दुपारी उडी घेऊन आत्महत्या केली. विशाल पवार याने मृत्यूपूर्वी तीन चिठ्ठय़ा लिहून ठेवल्या त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. एक चिठ्ठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या नावाने आहे. त्यात शासनाचे आणि बँकेचे कर्ज तद्वतच नापिकीमुळे आता जगण्याची इच्छा उरली नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आता तरी सरकार माझे कर्ज माफ करेल, अशी अपेक्षाही या चिठ्ठीत त्याने व्यक्त केली आहे. मुलगी, पत्नी आणि आई-वडिलांना लिहिलेल्या चिठ्ठीत, मी तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकलो नाही, याबद्दल मला माफ करा, असा मजकूर लिहिला आहे.
संजय राठोड यांनी दोन महिन्यांपूर्वीच यवतमाळ जिल्ह्य़ात कधी नव्हे इतकी पीक परिस्थिती चांगली असल्याचे म्हटले होते.या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला प्रचंड असंतोष लक्षात घेता जिल्ह्य़ात पीक पैसेवारी पुन्हा काढण्याचे आदेशही त्यांनीच दिले होते आणि नेर, दारव्हा व दिग्रस या तीनही तालुक्यांत पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी निघाल्याने हे तालुके सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले.

जिल्हा परिषदेत विषय गाजला
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात पालकमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी यावी, ही घटना म्हणजे शेतकरी आत्महत्या थांबवण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरवा असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटली.